मुंबई, 24 मे : भारताच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे रोजी होत आहे. संसद भवनाच्या या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते होत नसल्यामुळे विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांच्या बहिष्काराच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी विरोधकांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचीही आठवण करून दिली आहे.
‘लोकशाहीमध्ये काविळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे. नवीन संसद भवन या देशाची शान आहे, या देशाची ताकदही आहे. जेवढ्या कमी वेळात हे संसद भवन जेवढ्या भव्यतेने बनलं आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे, असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत, ते कारणं सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला डबल लॉटरी! मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
‘यापूर्वी 1975 साली लोकसभेच्या एनेक्स बिल्डिंगचं उद्घाटन इंदिरा गांधी यांनी केलं होतं, मग ते लोकशाही विरोधी होतं का? संसदेतली लायब्ररी आहे त्याचं भूमिपूजन राजीव गांधी यांनी केलं होतं, ते लोकशाही विरोधी होतं का? वर्षानु वर्ष नवीन संसद भवन बनवायची चर्चा व्हायची, कुणी बनवू शकलं नाही, ते मोदीजींनी बनवून दाखवलं, त्यामुळे कुठेतरी पोटात दुखत आहे’, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
‘विरोधकांचा लोकशाहीवरही विश्वास नाही आणि लोकशाहीच्या मंदिरावरही विश्वास नाही. ही फक्त भारताच्या लोकसभेची किंवा संसदेची इमारत नाही, ही इमारत नव्या भारताच्या ताकदीची इमारत आहे’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चार मजल्यांच्या या नव्या संसद भवनामध्ये 1200 खासदार बसू शकतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या आमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.