दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे अनेकांकडून हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये द काश्मीर फाईल्स चित्रपटाला करमुक्तही करण्यात आले आहे. यामुळे आता महाराष्ट्रात देखील चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ‘राज्याने हा सिनेमा करमुक्त करण्यापेक्षा केंद्र सरकारने हा सिनेमा देशात करमुक्त करावा’ अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. द काश्मीर फाईल्स चित्रपटाला हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशसह इतर राज्यांत करमुक्त करण्यात आले आहे.
याकारणाने महाराष्ट्रात देखील चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. परंतु फक्त महाराष्ट्रातच का संपूर्ण देशभरात या चित्रपटाला करमुक्त करण्यात यावे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ आहे.
या चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटींच्या वर कमाई केली आहे. राजकिय नेत्यांपर्यंत ते कलाकारांपर्यंत सर्वजन चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट राजकिय वर्तुळात नविन वादाचे कारण बनला आहे.
सोशल मिडीयावर द काश्मीर फाईल्स चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. विविध विचारसरणीचे लोक आपले मत मांडून चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहेत. आता #TheKashmirfiles सोबत #Godhra सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. लोकांनी विवेक अग्निहोत्री यांना काश्मीर फाईल्स नंतर गोधरा हत्याकांडवरती चित्रपट बनविण्याची विनंती केली आहे.
तसेच ‘द 1947 फाईल्स’ ट्रेनच्या आगीवरील “द गोधरा फाईल्स”, पोलिस गोळीबारावर “द कारसेवक फाईल्स” आणि गॅस घोटाळ्यावर “द भोपाळ फाईल्स” असे चित्रपट देखील बनविण्यासाठी प्रेक्षकांनी विवेक अग्निहोत्रीला मागणी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या मुद्यांवर चित्रपट येणार का या प्रतीक्षेत लोक आहेत.