बंगलोर, 14 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला 136 जागांवर विजय मिळाला आहे. तर, भाजप 65 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणं काँग्रेस हायकमांडसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एका ओळीचा ठराव मंजूर करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणजेच मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या बेंगळुरूमधील शांग्री-ला हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी हॉटेलबाहेर उपस्थित सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचे समर्थक आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना दिसले.
यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेत्याची निवड करण्यासाठी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, जितेंद्र सिंग आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत या तिघांनी नव्या नेत्याच्या निवडीबाबत आमदारांची मते जाणून घेतली.
वाचा – ‘नाक्यावर सभा घेणारी माणसं…’, कर्नाटकच्या निकालावरून राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये जुंपली
कर्नाटकमधील निवडणुकीतील विजयानंतर सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. काँग्रेस नेतृत्व त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या बाजूने आहे. अध्यक्ष म्हणून डीके शिवकुमार यांची मेहनत आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य पाहता त्यांना उपमुख्यमंत्री आणि अनेक महत्त्वाची मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. काँग्रेसच्या सूत्रांनी असेही सांगितले की डीके शिवकुमार यांच्यावर ईडीचे खटले असल्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे. सत्तेत आल्यानंतर भाजप यावरुन वाद निर्माण करू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री होणे कठीण होऊ शकते. डीके शिवकुमार सोनिया गांधी आणि राहुल गांधी जे काही बोलतील ते मान्य करायला तयार आहेत, पण त्यांना दुसरा उपमुख्यमंत्री नको आहे.
हायव्होल्टेज कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. 224 पैकी 135 जागा मिळाल्या. भाजपने 65 जागा जिंकल्या, तर JD(S) 19 जागा जिंकल्या. दोन अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक जिंकली आणि कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली. किंगमेकर बनण्याच्या आशेवर असलेल्या JD-S ने 19 जागा जिंकल्या, जे गेल्या वेळच्या 37 जागांपेक्षा कमी आहे. त्यांचं मताधिक्यही गेल्या निवडणुकीत 18 टक्क्यांवरून 13.32 टक्क्यांवर घसरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.