अकोला :
डिजिटल सदस्य नोंदणी मोहिमेतील कामगिरी आणि निवडणूक पूर्व सर्वेक्षण यांच्या आधारावरच आगामी अकोला (Akola) महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन अकोला जिल्हा काँग्रेसचे संपर्क मंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. जिल्हा काँग्रेसच्या स्वराज भवन या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. राऊत (Nitin Raut) हे रविवारी अकोला जिल्हा भेटीवर आले असता त्यांचा काँग्रेस (Congress) मुख्यालयात सत्कार करण्यात आला. काँग्रेस नेत्यांनी एकजूट दाखविली आणि मन लावून काम केले तर अकोला मनपा (Municipal Corporation) निवडणूक (Election) जिंकणे काँग्रेसला कठीण नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते इच्छुक आहेत. सध्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी डिजिटल सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी किती सदस्य नोंदणी केली हे तिकीट वाटप करताना लक्षात घेतले जाणार आहे.
याशिवाय महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी सर्वेक्षणही केले जाणार आहे. सदस्य नोंदणीत उत्तम कामगिरी करणारे आणि सर्वेक्षणात ज्यांच्या बद्दल सकारात्मक अहवाल येईल अशा नेते, कार्यकर्त्यांना मनपाचे तिकीट देताना प्राधान्य दिले जाईल,असे डॉ. राऊत यांनी सांगितले. मनपा निवडणुकीत मी काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
याप्रसंगी माजी आमदार नतिकुद्दीन खतीब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर, डॉ. प्रशांत वानखडे, अकोला शहर काँग्रेस अध्यक्ष, प्रदेश काँग्रेस सचिव प्रकाश तायडे, डॉ.झिशन हुसैन, अकोला मनपा विरोधी पक्षनेते, साजिद खान माजी विरोधी पक्षनेते, अकोला ग्रामीण काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पूजा खाडे, महिला शहर अध्यक्ष पुष्पा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अर्चना राऊत व नगरसेविका विभा राऊत, अनुजा शहा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.