अहमदाबाद, 14 एप्रिल : पंजाब किंग्ज इलेव्हनविरुद्धचा सामना अखेरच्या षटकात ६ विकेट राखून जिंकत गुजरात टायटन्सने तिसऱ्या विजयाची नोंद केली. याआधी एका लढतीत गुजरातला पराभव पत्करावा लागला होता. पंजाबविरुद्धच्या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यावेळी पंचांनी नियम मोडून गुजरातला मदत केली असा आरोप पंजाबचे चाहते करत आहेत.
हार्दिक पांड्या याआधीच्या सामन्यात खेळला नव्हता. तो पुन्हा संघात परतला. तर मोहित शर्माने गुजरातकडून पदार्पण केलं. या सामन्यात पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंग दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवनही फक्त ८ धावात तंबूत परतला. पंजाबच्या ६ षटकात २ बाद ५२ धावा झाल्या होत्या. त्यावेळी मॅथ्यू शॉर्टने फटकेबाजी केली. भानुका राजपक्षेने दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केले.
IPL 2023 : एम एस धोनी ते गौतम गंभीर, या खेळाडूंनी मारले आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब Six
सामन्यात सातव्या षटकात राशीद खानने मॅथ्यू शॉर्टला बाद करून गुजरातला मोठं यश मिळवून दिलं. शॉर्टने २४ चेंडूत ३६ धावा केल्या. त्यानंतर राजपक्षे आणि जितेश शर्मा यांनी पंजाबचा डाव सावरला. दरम्यान, गुजरातकडून पदार्पण करणाऱ्या मोहितने ही जोडी फोडली. जितेश शर्मा २३ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. पण या विकेटवरून वादाची शक्यता आहे. मोहित शर्माने टाकलेला चेंडू जितेशच्या बॅटला कड घेऊन यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हाती गेला. साहाने आवाज आल्याचं सांगत अपील केलं. तर मोहितला आवाजच ऐकू आला नव्हता.
हार्दिक पांड्या डीआरएस घेण्याबाबत वृद्धीमान साहाला विचारणा करत होता. तेव्हा १५ सेकंद काऊंटडाऊन सुरू होता. काउंटडाऊन शून्यावर आल्यानंतर हार्दिक पांड्याने डीआरएस घेतला. आपण उशीरा डीआरएस घेतल्याचं समजताच हार्दिकने डोक्यावर हातही मारला. दरम्यान, पंचांनी काउंटडाऊन शून्यावर असतानाही डीआरएस दिला आणि पंजाबची विकेट पडली. आता वेळ संपली असतानाही हार्दिक पांड्याला डीआरएस मिळाल्याने चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.