मुंबई, 22 एप्रिल : मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर शनिवारी आयपीएलचा 31 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने घेतलेला एक चुकीचा निर्णय मुंबई संघाला महागात पडला. त्यामुळे 14 व्या ओव्हर्सपर्यंत आटोक्यात असलेली पंजाब किंग्सची धाव संख्या शेवटच्या ओव्हरपर्यंत 200 पार गेली. रोहितच्या या चुकीच्या निर्णयामुळे सध्या त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुरुवातीचे काही ओव्हर्स मुंबईच्या फलंदाजांनी विकेट्स घेत समोरच्या संघावर प्रेशर बनवत धाव संख्या देखील आटोक्यात ठेवली होती. परंतु 16 व्या ओव्हरमध्ये रोहितने घेतलेलया एका निर्णयाचा मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला.
पंजाब किंग्सची फलंदाजी सुरु असताना अथर्व तायडेची 10 ओव्हरमध्ये विकेट घेण्यात मुंबईच्या गोलंदाजाला यश आले. परंतु त्यानंतर पुढील काही ओव्हर्स मुंबईच्या गोलंदाजांना एकही विकेट घेण्यात यश मिळत नव्हते. अशावेळी अनुभवी गोलंदाजांना गोलंदाजी देण्याचे सोडून कर्णधार रोहित शर्माने अनुभव नसलेल्या अर्जुन तेंडुलकरला 16 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीची पाठवले. सामन्याच्या सुरुवातीला यॉर्कर टाकून प्रभ सिमरनची विकेट घेतलेल्या अर्जुनने 16 व्या ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा दिल्या. अर्जुनच्या जवळपास प्रत्येक बॉलवर सॅम करन आणि हरप्रीत याने चौकार षटकार ठोकले त्यामुळे अर्जुनाची ही ओव्हर मुंबईला अतिशय महागात पडली. यामुळेच पंजाब किंग्सला 20 ओव्हरमध्ये 214 धावा करण्यात यश आले.
2 विकेट घेतलेला अनुभवी गोलंदाज कॅमरुन ग्रीनची एक ओव्हर , बेहरनडॉर्फच्या दोन ओव्हर , जोफ्रा आर्चरच्या दोन ओव्हर तर 3 ओव्हरमध्ये 15 रन देऊन 2 विकेट घेतलेल्या पियुष चावलाची देखील एक ओव्हर शिल्लक असताना सुद्धा अनुभवी गोलंदाजांना डावलून रोहितने अर्जुनला दिलेल्या बॉलिंगने त्याच्यावर चौफेर टीका केली जात आहे. तसेच सामन्याच्या एवढ्या महत्वाच्या क्षणी अर्जुनला बॉलिंग देऊन रोहितने मोठी घोडचूक केल्याचे ही सोशल मीडियातून बोलले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.