मुंबई, 12 एप्रिल : आयपीएलच्या १६ व्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला ६ गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ६ चौकार आणि ४ षटकारही मारले. रोहित शर्माने २०२१ नंतर पहिल्यांदा आयपीएलमध्ये अर्धशतक केलं. अर्धशतकानंतर रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत होता पण मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर दिल्लीचा विकेटकिपर अभिषेक पोरेलने त्याचा जबरदस्त झेल घेतला.
रोहित शर्मा १६ व्या षटकात मुस्तफिजूरच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला. यावेळी २० वर्षांच्या अभिषेकने हवेत झेप घेत चेंडू झेलला. यामुळे सामन्यात दिल्लीने पुनरागमन केलं. रोहित शर्माला सुद्धा अभिषेकने झेल घेतल्यानंतर विश्वास बसला नाही. अभिषेकने झेल घेतल्यानंतर रोहित शर्माने पंचांकडे डीआरएसची मागणी केली. बॅटला चेंडू लागला त्यानंतर तो जमिनीला लागला असं रोहित शर्माला वाटलं. पण डीआरएसमध्ये चेंडू बॅटला लागून थेट विकेटकिपर अभिषेक पोरेलच्या हाती गेल्याचं दिसलं.
दिल्लीने पायावर मारून घेतली कुऱ्हाड, शेवटच्या षटकात रंगला थरार, मुंबईने मारली बाजी
दिल्ली कॅपिटल्सकडून यंदाच्या हंगामात अभिषेक पोरेलला पदार्पणाची संधी मिळालीय. त्याला ऋषभ पंतच्या जागी संघात घेण्यात आलं आहे. यष्टीरक्षक फलंदाज असलेला पोरेल हा २०२२ मध्ये अंडर १९ वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या भारतीय संघात होता. त्याने रणजी पदार्पणात अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर रणजी फायनलमध्येही अर्धशतक केलं होतं. त्याला दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगने संघात घेतलंय.
संघात निवड झाल्यानंतर जेव्हा ऋषभ पंत सामन्यावेळी स्टेडियमवर होता तेव्हा अभिषेकने त्याच्याकडूनही मार्गर्शन घेतलं. तेव्हा ऋषभ पंतने अभिषेकला चिंता करू नको, परिस्थिती जशी असेल तसा खेळ असं म्हणत शुभेच्छा दिल्याचं अभिषेकने सांगितलं होतं.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत १६ फर्स्ट क्लास सामने अभिषेकने खेळले असून यात ६९५ धावा केल्या आहेत. यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ७३ इतकी आहे. अभिषेकने ३ लिस्ट ए सामन्यात एका डावात खेळताना ५४ धावा केल्या आहेत. याशिवाय ३ टी२० सामने खेळले असून यात २२ धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.