मुंबई 14 एप्रिल : राजस्थानमधील करौली येथे एका महिलेच्या शौर्याने पतीला मगरीच्या हल्ल्यातून वाचवलं. बन्ने सिंग या २६ वर्षीय युवकावर मगरीने हल्ला केला होता. बन्नेसिंग आपल्या शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी चंबळ नदी पार करत असताना मगरीने त्याचा पाय पकडला. यानंतर जे झालं यावर तुमचा विश्वास बसणार नाही. शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या पत्नी विमलबाईने तात्काळ धाव घेत मगरीला काठीने मारून पतीचा पाय तिच्या तावडीतून सोडवला पण तो सुटला नाही. कारण मगरीने तो अतिशय घट्ट पकडला होता.
पत्नी घाबरली होती आणि विचार करू लागली की अखेर पतीला मगरीच्या तावडीतून सोडवायचं कसं? विमलबाईंनी मगरीच्या डोळ्यावर काठीने वार केल्यावर मगरीने पतीला पाण्यात ओढण्यास सुरुवात केली. यानंतर काही वेळाने मगरीने बन्ने सिंगला सोडलं आणि ती पाण्यात परत गेली. यानंतर ही जोडी सुखरूप घरी परतण्यात यशस्वी झाली. बन्ने सिंग हे त्यांच्या पत्नीच्या शौर्यामुळे वाचले मात्र ते जखमी झाले आहेत.
विमलबाईंच्या धाडसाने आणि सतर्कतेमुळे त्यांच्या पतीला १५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर अखेर मगरीच्या तावडीतून सुटता आलं. बन्ने सिंग यांनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं, की ही त्यांच्या पत्नीने त्यांना दिलेलं आतापर्यंतची सर्वोत्तम गिफ्ट आहे.
दुसरीकडे विमलबाईंनी असा दावा केला, की आपल्या पतीचा जीव जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ती त्याला वाचवण्यासाठी आपला जीव देखील देऊ शकते. ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये विमलबाई म्हणाल्या, “मी फक्त माझ्या पतीचा जीव वाचवण्याचा विचार केला. मी माझ्या जीवाचा विचार केला नाही. मला वाटलं की माझ्या पतीचा जीव वाचेल.” इंटरनेटवर व्हायरल झालेल्या क्लिपसह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, “शूर विमल मीनाची कहाणी, जिने आपल्या पतीला मगरीच्या तोंडातून वाचवलं. सरकार तिचा सन्मानही करू शकतं”.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.