मुंबई, 10 एप्रिल: कधी-कधी सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडते की, त्यामुळे फार मोठा गोंधळ उडतो. भाईंदरमधील एका गृहिणीला ठाणे आयकर विभागानं 20 कोटी रुपयांचे बँक व्यवहार केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. आशा देवीचंद जैन असं या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे तिच्या पतीला केवळ 27 हजार रुपये पगार आहे. या महिलेनं आयकर विभागाला जबाब दिला असून, तिच्या नावावर कोणीतरी फसवणूक केल्याचा दावा केला आहे. ‘मिड डे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पॅनचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्याचा दावा
भाईंदर पश्चिमेतील बकोल रस्त्यावरील फेरो कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या जैन यांना आयकर विभागाच्या ठाणे कार्यालयानं 29 मार्च रोजी नोटीस पाठवली होती. आशा देवी यांनी 2016-17 आर्थिक वर्षात आयसीआयसीआय बँक आणि डीसीबी बँकेच्या दोन स्वतंत्र खात्यांमधून 20 कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत, असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं होतं. आपण असा कोणताही व्यवहार केला नसल्याचा दावा करणाऱ्या जैन यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलं की, कोणीतरी त्यांचं पॅन आणि आधार कार्ड वापरून सिद्धी एंटरप्रायझेस नावाची कंपनी सुरू केली आहे. या कंपनीनं मुंबई आणि इतर शहरांमध्ये असंख्य व्यवहार केले होते.
तुमच्या शहरातून (मुंबई)
दोन खात्यांमधून व्यवहार
आयकर विभागानं नमूद केलेल्या दोन बँक खात्यांपैकी एक खातं 2015 मध्ये बंद केलं होतं तर दुसरं खातं 9 नोव्हेंबर 2016 रोजी बंद करण्यात आलं होतं. खातं बंद करण्यापूर्वी त्यातून 6,37,91,266 रुपयांचे व्यवहार करण्यात आले होते. चौकशी केल्यावर निदर्शनास आलं की, या खात्याशी आणखी कोणाचा तरी मोबाईल नंबर जोडला गेला आहे. दुसरं खातं बंद केल्यानंतर, डीसीबी बँकेत आशा जैन यांच्या नावानं आणखी एक नवीन खातं उघडण्यात आलं होतं. ज्यामध्ये 2016-17 मध्ये 14,03,96,173 रुपयांचे व्यवहार झाले होते.
16 लाखांचं गृहकर्ज
या व्यवहारांच्या बदल्यात 2016-17 या वर्षासाठी केवळ 1,53,900 रुपयांचे रिटर्न भरले गेल्यानं आयकर विभागाने आशादेवी यांना नोटीस पाठवली आहे, ज्यात अज्ञात व्यवहारांबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. ‘मिड-डे’शी बोलताना जैन यांनी सांगितले की, या व्यवहारांची त्यांना कल्पना नव्हती. त्या म्हणाल्या, “माझे पती दर महिन्याला 27 हजार रुपये कमवतात. फ्लॅटसाठी आम्ही 16 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं आहे. आमच्याकडे 20 कोटी रुपये असते तर आम्ही फ्लॅट घेण्यासाठी कर्ज का घेतलं असतं?” आशा देवी यांनी सांगितलं की, कोणीतरी त्यांचं पॅन आणि आधार कार्ड तपशील वापरून सिद्धी एंटरप्रायझेस नावाची कंपनी तयार केली आहे.
मुलांना शिकवण्यासाठी ट्रस्टची मदत
आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं आशादेवी यांनी आपल्या दोन मुलांना शिकविण्यासाठी ट्रस्टकडून मदत घेतलेली आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही एका चाळीत राहायचो. मुलं मोठी झाल्यावर आम्ही चाळीतील घर विकलं आणि आता राहत असलेल्या फ्लॅटसाठी कर्ज घेतलं. माझ्या पतीचा पगार कर्जाचे हप्ते भरण्यासाठी जातो. आयकर विभागानं माझं घर जप्त केलं तर आम्हा सर्वांना आत्महत्या करावी लागेल.”
जैन यांनी या प्रकरणी भाईंदर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आयकर विभागाकडे तपशील सादर केला आहे. मात्र, आयकर विभागाचं त्याबाबत समाधान झालं नाही.
भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुकुटराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘मिड-डे’ला सांगितलं की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुरावे गोळा केल्यानंतर तक्रारदारानं ज्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून पुढील कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.