मुंबई, 7 एप्रिल : पोहण्यासारखा उत्तम व्यायाम नाही, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. उन्हाळ्यामध्ये तर स्विमिंग क्लास लावणाऱ्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असतं, पण स्विमिंग पूलमध्ये उतरणं आणि पोहणं मुंबईतल्या महिलेच्या जीवावर बेतलं आहे. स्विमिंग करत असताना हार्ट अटॅक आल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला तिच्या पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये उतरली होती, तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली. महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तेव्हा तिचा मृत्यू झालेला होता.
मुंबईच्या चेंबूर भागामधल्या जनरल अरुण कुमार वैद्य स्विमिंग पूलमधली ही घटना आहे. ट्रॉम्बेमध्ये राहणाऱ्या 61 वर्षांच्या रेणुका कोळी त्यांचे पती गजानन कोळी यांच्यासोबत ऑक्टोबर 2022 पासून स्विमिंगला येत होत्या. रेणुका मंगळवारी सकाळी 8 वाजता स्विमिंग पूलमध्ये उतरल्या, यानंतर त्यांच्या तोंडातून फेस यायला सुरूवात झाली.
स्विमिंग पूल स्टाफने रेणुका यांना बाहेर काढलं आणि जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता रेणुका यांना आयसीयूमध्ये भरती करायला सांगितलं. यानंतर त्यांना लगेच झेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिकडे त्यांना मृत घोषित केलं गेलं.
तुमच्या शहरातून (मुंबई)
महिलेला वेळेत उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता, असं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर बीएमसीद्वारा संचलित स्विमिंग पूलच्या प्राथमिक चिकित्सेच्या सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या स्विमिंग पूलमध्ये फेब्रुवारी महिन्यात दोन जलतरणपटू जखमी झाले होते, तेव्हा त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून रुग्णालयात नेलं गेलं होतं, असंही सांगण्यात येत आहे.
कोरोना काळाआधी बीएमसीच्या बहुतेक स्विमिंग पूल परिसरात अॅम्ब्युलन्स उभी असायची. या अॅम्ब्युलन्सचा वापर आपत्कालिन परिस्थितीमध्ये स्विमिंग पूलमध्ये काही दुर्घटना घडली तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी केला जायचा. पण कोरोना महामारीनंतर ही सुविधा बंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.