नवी दिल्ली 20 एप्रिल : एका शोदरम्यान जिम्नॅस्टिक करताना पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, महिला अॅक्रोबॅट तिच्या नवऱ्यासह लाइव्ह परफॉर्म करत होती. तेव्हा अचानक तिचा हात सुटला आणि ती 30 फूट उंचीवरून खाली पडली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. ही घटना चीनमधून समोर आली आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, 37 वर्षीय सन मोमोऊ तिचा पती झांग याच्यासोबत चीनच्या मध्य अनहुई प्रांतातील होउगाओ गावात परफॉर्म करत होती. दोघांनी केबलच्या मदतीने स्टेजपासून 30 फूट उंची गाठली. इथे परफॉर्म करताना पती झांगच्या पायावर पाय ठेवून सन उठून उभा राहिली. नंतर तिने झांगची मान पकडली आणि हवेत लटकली. दरम्यान, तिचा हात सुटला. तिने झांगच्या पायाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला आणि ती खाली पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
पेद पेपरनुसार, सन आणि तिचा पती झांग यांनी अनेक वर्षे एकत्र काम केलं होतं. त्यांनी सेफ्टी बेल्टशिवाय अनेक स्टंट एकत्र केले आहेत. न्यूज वेबसाईटने पुढे म्हटलं आहे, की घटनेच्या वेळी या जोडप्यामध्ये वाद सुरू होता. महिला कलाकाराला सेफ्टी बेल्ट घालण्यास सांगितलं होतं, तरी तिने नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.
परफॉर्मन्सदरम्यान चांगलं दिसण्यासाठी सनने सेफ्टी लाइन घालण्यास नकार दिला. दरम्यान, झांग याने पत्नीसोबत वाद झाला असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. तो म्हणाला की, त्याची पत्नी सनसोबत त्याचे संबंध खूप चांगले होते आणि त्यांच्यात कधीही भांडण झालं नाही.
या भयानक घटनेच्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. त्याचवेळी, चीनी मीडिया ग्लोबल टाईम्सनुसार, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं – आम्ही अपघाताचं खरं कारण शोधत आहोत. त्याचवेळी हा शो पाहण्यासाठी आलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने मीडियाला सांगितलं की – शोच्या आयोजकाने एवढ्या धोकादायक अॅक्रोबॅटिक्सच्या वेळी सुरक्षा जाळीही लावली नव्हती. तसंच गावातील अरुंद रस्त्यांमुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास बराच वेळ लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.