नवी मुंबई, 3 एप्रिल : नवी मुंबईतील बेलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात पतीने आपल्याच पत्नीचा गळा दाबून नंतर पोटात चाकू भोसकून तिचा खून केला. तसेच यानंतर आरोपी पती स्वतःहून बेलापूर पोलीस ठाण्याच्या हजर झाला आणि आपण रागाच्या भरात पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
जसपालसिंग मसुता असे 36 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो मागील अनेक वर्ष नोकरी साठी कतार या ठिकाणी जात होता. तर अनेकवेळा सुट्टीसाठी घरी आल्यावर दोघांत खटके उडत होते. मागील महिन्यात हा आरोपी सुट्टीवर आल्यावर दोघांत भांडणे सुरू झाली. आरोपी पतीने पत्नीला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीत काहीच सुधारणा होत नसल्याचे आरोपी पतीने पोलिसांना सांगितले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
कालच्या रात्री एका बाजूला दोघेही एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस आटोपून आले आणि दोघांत जोरात भांडण झाले. त्यावेळी घरात पाच वर्षाची मुलगी होती. भांडणे इतकी टोकाला गेली की आरोपी पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीचा गळा दाबला. तसेच पत्नी मेल्याची खात्री होत नसल्याने त्याने तिच्या पोटात चाकूने वार केले.
त्यानंतर काही वेळाने आरोपी स्वतः बेलापूर पोलीस ठाण्याच्या हजर झाला. याठिकाणी त्याने पोलिसांसमोर येऊन आपण पत्नीला ठार मारल्याची कबुली दिली. यानंतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांनी एक टीम घटनास्थळी पाठवली. पोलिसांनी घडलेली घटना खरी असल्याचे सांगितले.
यानंतर आरोपी सिंग याला पोलिसांनी अटक केली आणि आज कोर्टात हजर केले. यावेळी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यात आणखी काही माहिती मिळते का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेने बेलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.