चंदीगड 28 एप्रिल : हरियाणातील मानेसरमध्ये पोलिसांनी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. त्याने आधी पत्नीचे हात कापले. नंतर डोकं तोडलं. त्यानंतर मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. आरोपी पतीने आपला गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी महिलेचं कापलेलं डोके आणि शरीराचे सर्व अवयवही जप्त केले आहेत.
21 एप्रिल रोजी पोलिसांना मानेसर गावात एका महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. मृतदेहाचं डोकं गायब असून हात कापलेले होते. या महिलेची हत्या अन्यत्र झाल्याचा संशय पोलिसांना होता.
यानंतर पोलिसांना 23 एप्रिलला महिलेचे कापलेले हात आणि 26 एप्रिलला तिचं डोकं सापडलं. खेरकिदौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचं शीर सापडलं. याप्रकरणी पोलिसांनी आता महिलेचा पती जितेंद्र याला अटक केली आहे. जितेंद्र हा गांधीनगरचा रहिवासी आहे. तो मानेसर येथे भाड्याने राहत होता. पोलीस जितेंद्रची चौकशी करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव चौकाजवळील कुकडोला गावात एका घरात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. उमेद सिंग नावाच्या व्यक्तीने करारावर घेतलेल्या जमिनीत हे घर बांधलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव चौकातून कासन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उमेदसिंग यांनी आठ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. उमेद सिंग यांनीच मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना दिली.
उमेद सिंहने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, माझ्या शेजाऱ्याने मला फोनवर सांगितलं की, माझ्या शेतात बांधलेल्या घरातील एका खोलीतून धूर निघताना दिसला. शेतात गेलो असता खोलीत अर्धे जळालेले धड आढळून आले. त्यानंतर लगेचच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस सूत्राने सांगितलं की, आरोपीने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आता पोलीस आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पुरावे गोळा करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.