धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 18 मे : सध्या आंब्याचा मोसम सुरु आहे. भारतातले आंबे परदेशात मिळणे म्हणजे परमभाग्यच. आंब्याचा हंगाम म्हटले की कोकणच्या राजाची चव चाखण्याची संधी संपूर्ण महाराष्ट्रवासियांना मिळत असते. परंतु, परदेशात राहणाऱ्या भारतीय तसेच महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आंबा निर्यात केला जातो. नोकरी, कामानिमित्ताने परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन तसेच भारतीय नागरिकांना ही चव चाखायला मिळावी यासाठी त्या त्या देशांच्या अटीनुसार आंबा निर्यात करण्याची यंत्रणा राज्य पणन मंडळाच्या वतीने राबविण्यात येत आहे. पण परदेशात आंबा पाठवण्यासाठी काय नियम अटी पूर्ण लागतात याचीच माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सहाय्यक सर व्यवस्थापक सतीश वाघमोडे यांनी दिली आहे.
प्रक्रिया करणे बंधनकारक
तुमच्या शहरातून (मुंबई)
आंबा हंगाम 2023 मध्ये राज्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला विकसित देशांची बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधेवरुन आयातदार देशांच्या निकषान्वये निर्यातीपूर्वी आंब्यावर व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. फळमाशी (फ्रूट फ्लायचा) चा होणारा प्रादुर्भाव नष्ट होण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.
अमेरिका, युरोपियन, जपान, देशांसह अन्य छोट्या-मोठ्या देशांमध्ये विविध जातीचे आंबे निर्यात करण्यात येतात. त्याकरिता पणन मंडळाने वाशी येथे विविध यंत्रणा कार्यान्वित केली आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने वाशी येथे विकीरण सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. त्या केंद्रावरून अमेरिकन कॉरंटाइन इन्स्पेक्टरांच्या देखरेखीखाली आंबा निर्यात करण्यात येतो. आयातदार देशांच्या निकषान्वये निर्यातीपूर्वी आंब्यामधील कोयकिडा आणि किटकांचे निर्मुलन करण्याकरिता विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. कृषी पणन मंडळामार्फत निर्यातदारांच्या मागणीनुसार राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अपेडा यांच्या सहकार्याने विकिरण सुविधा केंद्राची वाशी येथे उभारणी करण्यात आल्यामुळे ही सोय झाली आहे, असं सतीश वाघमोडे यांनी सांगितले.
आंब्याना मोठ्या प्रमाणात मागणी
नवी मुंबई येथील वाशी एपीएमसी मार्केट मधून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया या ठिकाणी आंबा पाठविला जातो. कापूस केशर बेगमपल्ली या मुख्यत्वे तीन आंब्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर मल्लिका, तोतापुरी, राजापुरी या सुद्धा परदेशात पाठवल्या जातात. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या तीन सुविधा केंद्रातून आतापर्यंत 1300 मॅट्रिक टन आंबा परदेशात गेलेला आहे. अमेरिकेसाठी 375 मॅट्रिक टन, युरोपियन देशात 800 पेक्षा जास्त मॅट्रिक टन, जपान, साऊथ कोरिया, न्युझीलँड या देशात 40 टन आंबा निर्यात झालेला आहे.
नेहमीच्या पिकामध्ये चालवलं डोकं, शेतकरी झाला लखपती, Video
अमेरिकेत भारतीय वंशाचे नागरिक, डॉक्टर्स, आयटी नोकरदार, उद्योजकांची महाराष्ट्राच्या आंब्याला मागणी असते. ते प्रामुख्याने ग्राहक आहेत. इतर देशातून अमेरिकेत येणाऱ्या आंब्यापेक्षा भारतीय आंब्याला ते प्रथमच प्राधान्यक्रम देतात, अशी माहिती सतीश वाघमोडे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.