मुंबई, 28 एप्रिल : भाकरी फिरवावी लागते, आणि ती फिरवली नाही तर करपते. भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे, त्यासाठी विलंब करून चालणार नाही, शरद पवारांच्या या सूचक विधानामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात असल्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं.
शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठी माहिती समोर येत आहे. राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. रोहित पवारांनीही याला दुजोरा दिला आहे.
‘जर अशी संधी दिली गेली, राष्ट्रवादीकडून असं नाव पुढे गेलेलं आहे, असं मलाही कळतंय. त्या संधीचं सोनं मी नक्की करेन. हे करत असताना युवांना संधी दिल्यानंतर ते काय पद्धतीने काम करू शकतात, त्या पदाला कसा न्याय देऊ शकतात, हे संधी दिल्यानंतर मी दाखवून देईन,’ असं रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक आशावादी, जयंत पाटील मनातलं बोलले!
दरम्यान लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवारांच्या नावाला राष्ट्रवादीतून विरोध होत असल्याची चर्चा आहे. अनुभवी नेत्याच्या नावाची शिफारस न केल्याने रोहित पवारांना विरोध असून, अनुभवी नेत्याला पद द्या, अशी मागणी राष्ट्रवादीमध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकलेखा समितीचं अध्यक्षपद विरोधी पक्षाला द्यावं लागतं, हे पद कोणाला द्यायचं ते महाविकासआघाडी ठरवेल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
शरद पवार अजितदादांचीच ‘भाकरी’ फिरवणार? शिवसेनेनं सांगितली Inside Story
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.