मुंबई, 17 मे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाने उमेदवारच बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याऐवजी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाला पसंती असल्याचं सांगण्यात येतं आहे. तर अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून, भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात उतरण्यात येणार आहे.
याशिवाय दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
तसंच शिवसेना ठाकरे गट मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून माजी महापौर आणि विद्यमान प्रतोद सुनिल प्रभू यांना उमेदवारी देण्याची तयारी करत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमीका घेत मतदारसंघात उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच ठाकरे गटाच्या उमेदवारांना मतदारसंघात तयारीला लागा असे आदेश देण्यात आल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना ठाकरे गट ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून माजी खासदार संजय दिना पाटील किंवा महाविकास आघाडीत जागावाटपात अदलाबदल झाल्यास दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्या संदर्भात अंतीम चर्चा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
2019 लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या सर्व 6 जागांवर भाजप-शिवसेना युतीचा विजय झाला होता. मुंबई उत्तर-पश्चिममधून गजानन किर्तीकर, मुंबई दक्षिण-मध्य मधून राहुल शेवाळे आणि मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत खासदार झाले. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर गजानन किर्तीकर आणि राहुल शेवाळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.
जागा वाटपावरून रस्सीखेच
लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागावाटपावरुन महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. महाविकास आघाडीत लोकसभा लढवल्यास ठाकरे गटाने 20 जागांवर दावा ठोकलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एवढ्या जागा ठाकरे गटाला सोडायला तयार नाहीत. शिवसेनेजवळ आता अठरापैकी पाचच खासदार आहेत, त्यामुळे वीस जागांचा आग्रह कशासाठी? असा सवाल काँग्रेस-राष्ट्रवादीचे धुरीण करत आहेत. यात आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला होता, त्यामुळे लोकसभेसाठी उमेदवार निश्चिती आणि जागा निश्चिती करताना राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात संघर्ष उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसने 26 जागा लढवून अवघी एकच जागा जिंकली होती, त्यामुळे काँग्रेसचा 26 चा दावाही मान्य होण्याची शक्यता फारच कमी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.