सांगली, 25 मार्च : सांगलीमध्ये रंगलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा पहिला बहुमान प्रतिक्षाने मिळवला. लपेट डावावर प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला चितपट केलं. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास यावेळी चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आलं.
महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीमध्ये पार पडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा तालीम संघाने सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या. 45 किलो वजनी गटापासून 76 किलो वजनी गटात या कुस्त्या स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व गटात अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या कुस्त्या पार पडल्या.
Women Maharashtra Kesari : ऐसी धाकड है! प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि कल्याणच्या वैष्णवी पाटील हिच्यात अंतिम लढत झाली. ज्यामध्ये प्रतीक्षा हिने लपेट डावावर वैष्णवीला अवघ्या दोन मिनिटात चितपट करत विजय मिळवला आहे. महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या प्रतीक्षा बागडी हिला सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा,महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
पुरुष महाराष्ट्र केसरीला पाच लाख रुपये रोख आणि महिंद्रा थार
६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा शिवराज राक्षेने पटकावली होती. अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटात चीतपट केलं होतं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळाले. तर उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.