मुंबई, 02 मे : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्ध झंझावाती शतकी खेळी केली. त्याने यंदाच्या आय़पीएलमध्ये 9 सामन्यात 160 च्या स्ट्राइक रेटने 428 धावा केल्या आहेत. यात एका शतकासह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यशस्वी सध्या फॉर्ममध्ये असून त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. वानखेडे स्टेडियमबाहेर पाणीपुरी विकल्याच्याही चर्चा झाल्या. दरम्यान, यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांनी म्हटलं की, यशस्वीने पाणीपुरी विकून नाही तर कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलंय.
यशस्वी ज्वाला सिंह यांना 2013 मध्ये भेटला आणि तेव्हापासून तो त्यांच्यासोबतच आहे. ज्वाला सिंह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, मला त्याची पाणीपुरी विकण्याची गोष्ट आवडत नाही. त्याने कठोर मेहनत घेतली आणि त्यामुळेच तो क्रिकेट खेळत आहे. अनेक लोकांनी आझाद मैदानाजवळ स्टॉल लावले. कधी कधी तो सायंकाळी रिकामा असायचा तेव्हा थोडीफार मदत करायचा. असं नाही की त्याने पाणीपुरी विकली आणि भारतासाठी खेळला.
कोहली-गंभीरचा राडा! वादाची ठिणगी ज्याच्यामुळे पडली तो सोडून इतरांनाच दणका
ज्वाला सिंह यांनी यशस्वीचे वडील भूपेंद्र सिंह यांचा उल्लेख करताना म्हटलं की, मी त्यांना 25 डिसेंबर 2013 रोजी भेटलो होते. ते मला बोलले की मी त्यांच्या आय़ुष्यात देवासारखा आलोय. तुम्ही याला झाडू मारायला सांगा, फरशी पुसायला लावा. पण याला तुमच्यासोबत ठेवा आणि क्रिकेटर बनवा. यशस्वीच्या घरच्या लोकांनी मला त्याचे सगळे अधिकार दिले होते.
यशस्वी जयस्वाल दहा वर्षे प्रशिक्षक ज्वाला सिंह यांच्यासोबत राहिला. ज्वाला सिंह म्हणाले की, मी त्याला माझ्या मुलासारखा समजून वाढवला. 2013 नंतर त्याला कसला संघर्ष करावा लागला नाही. त्याला पहिलं बॅटचं कॉन्ट्रॅक्ट 40 हजार रुपयांमध्ये मिळवून दिलं होतं. आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळतात ती बॅट त्याला दिली. ज्वाला सिंह यांच्या मते 2013 नंतर गरिबीची काही गोष्ट नाही. जे होतं ते 2013 च्या आधी होतं. जेव्हा पाणीपुरीसारख्या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा आम्हाला त्रास होतो.
केएल राहुलच्या दुखापतीने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, WTC फायनल खेळणार का?
यशस्वी जयस्वालला फलंदाजीच्या तंत्रात बदल करण्यासाठी इंग्लंडला पाठवलं होतं. ज्वाला सिंह यांनी स्वत:ची पदरमोड त्यासाठी केली. जेव्हा कुणी करिअर सुरू करतं तेव्हा गरिबीचा मुद्दा असतो. माझाही होता, पण जेव्हा यशस्वीला भेटलो तेव्हा त्याला हे सगळं नाही विचारलं. कुणाच्या गरिबीची थट्टा करायची नव्हती असंही ज्वाला सिंह यांनी म्हटलं.
पाणीपुरी विकत असलेला एक यशस्वी जयस्वालचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यावरही ज्वाला सिंह यांनी बोलताना सांगितलं की, जेव्हा यशस्वी चर्चेत आला तेव्हा अनेकांनी त्याचा व्हिडीओ मागितला होता. तेव्हा यशस्वीला मजेतच पाणीपुरी द्यायला सांगितलं होतं. पण यशस्वीच्या कारकिर्दीत अनेकांचं योगदान आहे. यात दिलीप वेंगसरकर, वसीम जाफर, त्याची शाळा, मुंबई क्रिकेट असोसिएशन यांचा समावेश आहे. यशस्वीने कठोर मेहनती घेतली आणि त्याला क्रिकेटर बनवलं. गरिबीशिवाय त्याच्या मेहनतीची चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.