तेहरान, 19 मे : पाण्यावरून दोन देशांमध्ये युद्ध होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. इराणच्या राष्ट्रपतींनी हेलमंड नदीच्या पाणी करारवर तालिबान सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, आमच्या बोलण्याला गांभीर्याने घ्या म्हणजे नंतर तुम्ही तक्रार करणार नाही. यावर प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानचे जनरल मोबिन यांनी एक बॅरेल पाणी भरत असलेला व्हिडीओ शेअर करत इराणच्या राष्ट्राध्यक्षांना म्हटलं की, मिस्टर रायसी पाण्याचं हे बॅरेल घ्या आणि हल्ला करू नका.
दोन्ही देशांकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांवरून आता इराण आणि तालिबान यांच्यातील पाणी प्रश्नावर वाद वाढण्याची शक्यता आहे. तसंच हा वाद युद्धापर्यंत पोहोचू शकतो. दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्यांनी इराणला जाहीरपणे अशी वक्तव्ये न करण्याबद्दल इशारा दिला आहे.
गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच इराणचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी म्हटलं की, आमचे सरकार इराणच्या जल अधिकारांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. आम्ही आमच्या लोकांच्या अधिकारांवर गदा येऊ देणार नाही. हेलमंड नदी करारानुसार तालिबान सरकारने सिस्तान आणि बलूचिस्तानच्या लोकांना पाणी द्यावं. तालिबानने याकडे गांभीर्याने पहावं, पुन्हा याबाबत कोणतीही तक्रार करू नका. तसंच तालिबानने इराणच्या हायड्रोलॉजिस्टना हेलमंड नदीच्या पाणी पातळीची चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी असंही रायसी यांनी म्हटलं.
उंच इमारतींमुळे धोका, जगातलं सर्वात श्रीमंत शहर खचतंय; जिओलॉजिस्टनी दिला इशारा
अफगाणिस्तानकडून धमकी
अफगाणिस्तानमध्ये तालिबान जनरल मोबिनने एक व्हिडीओ जारी केल्यानंतर या वादाला नव्याने तोंड फुटलं. जनरल मोबिन एका पिवळ्या बॅरेलमध्ये पाणी भरत असून इराणचे राष्ट्राध्यक्षांना उद्देशून म्हणतात की मिस्टर “रायसी पाण्याचं हे एक बॅरेल घ्या आणि आमच्यावर हल्ला करू नका.” तालिबानकडून पिवळ्या बॅरेलचा वापर हा आत्मघाती आणि आईडी हल्ल्यांसाठी केला जातो. यातून तालिबानने इराणला थेट युद्धाची धमकीच दिली आहे.
तोडग्यासाठी इराणला आमंत्रण
इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी रात्री उशिरा प्रतिक्रिया दिली. त्यानंतर तालिबान प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने हंगामी सरकारकडून एक निवेदन जारी केलं. त्यात इराणच्या अधिकाऱ्यांना जाहीरपणे अशी वक्तव्ये टाळावीत असा इशारा दिला आहे. अफगाणिस्तान यात चर्चेसाठी तयार आहे पण देश दुष्काळाने त्रस्त आहे. त्यामुळे अफगाणिस्तानकडून इराणला पाणीपुरवठा मर्यादीत केला आहे. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या वादावर लवकरच तोडगा काढण्यासाठी इराणी अधिकाऱ्यांना अफगाणिस्तानमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिलं जाईल असंही अफगाणिस्तानने म्हटलं आहे.
दोन देशांमध्ये वादाचं कारण आहे नदी
इराणमध्ये दरवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो आणि त्यातही पावसाचं बहुतांश पाणी हे वाफ होऊन जातं. दोन्ही देशांच्या सीमेवर हेलमंड नदी असून तीच जीवनदायीनी आहे. दरम्यान, वातावरण बदलाचा परिणाम नदीपात्रावर होत असून ते कमी होत चालले आहे. यामुळे इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान या प्रांतात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालीय. हेलमडं नदी ही इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या वादाचेही कारण आहे. १९७३ मध्ये दोन्ही देशांमध्ये यावरून करार झाला होता. त्यानुसार अफगाणिस्तान दरवर्षी इराणला 820 क्युबिक मीटर पाणी देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.