चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 30 एप्रिल : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दावे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ असतील, अशा आशयाचे काही बॅनर महाराष्ट्रात विविध ठिकाणी लागले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर थेट पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार असं जाहीर केलं होतं. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
तुमच्या शहरातून (पुणे)
यावेळी “2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार” या जयंत पाटलांच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो.” महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास फायदा होईल का? असं विचारलं असता अजित पवार पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढल्यास निश्चित फायदा होईल, हे सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची गरज नाही, तीन पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर ज्या उद्देशाने भाजपाने एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन सरकार अस्तित्वात आणलं, याला दहा महिने पूर्ण झाले, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचं दिसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे जे आमदार गेले, त्यांच्या मतदारसंघातील मार्केट कमिटीच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्याचं पाहायला मिळालं, असंही अजित पवार पुढे म्हणाले.
वाचा – बारसूवरून ठाकरे विरुद्ध पवार? प्रकल्पावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले ‘जगात कुठं..’
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचं आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल.
बारसूला जाण्याचा प्रयत्न करणार : अजित पवार
मी पण बारसूला जाण्याचा प्रयत्न करणार आहे, सरकारने हा प्रश्न संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे. या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा नेमका किती विरोध हे तपासलं पाहिजे. अनेकदा एनजीओच विरोध करत असतात. बेरोजगारी कमी करायची असेल तर मोठे प्रकल्प आलेच पाहिजे. पण ते होताना पर्यावरणही राखलं गेलं पाहिजे. एन्रॉन प्रकल्पावेळी असाच विरोध झाला होता. पवार साहेबांच्या काळात पुढे विरोध करणाऱ्यांनीच तो प्रकल्प राबवल्याचं ही आपण सर्वांनी पाहिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.