पुणे 11 मे : आपल्यातील अनेकांचा पनीर हा अतिशय आवडीचा पदार्थ असतो. घरी काही खास सण किंवा स्पेशल दिवस असला की बहुतेक घरांमध्ये पनीर बनवलं जातं आणि मोठ्या आवडीने खाल्लंही जातं. मात्र, हेच पनीर तुमच्या जीवाशी खेळ तर करत नाही ना? हे तपासणंही आता तितकंच गरजेचं झालं आहे. नुकतंच पिंपरी चिंचवडमध्ये अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील मे. महाराष्ट्र मिल्क डेअरीवर खंडणी विरोधी पथक आणि अन्न व सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी छापे टाकले. यावेळी तब्बल 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दुधाच्या पावडरमध्ये अॅसिटिक अॅसिड टाकून अतिशय गलिच्छ पद्धतीने हे पनीर तयार केलं जात होतं. मागील अनेक वर्षांपासून हा उद्योग सुरू होता, ही बाबदेखील तपासात समोर आली आहे.
कडक चहा होणार बेचव, ‘हा’ पदार्थ गायब होण्याची चिन्ह, नेमकं काय बिघडलं?
तुमच्या शहरातून (पुणे)
या प्रकरणी डेअरीचा मालक साजिद मुस्तफा शेखसह अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या आरोग्यासोबत खेळ केला जात असल्याचं समोर आलं आहे.
पनीरमधील भेसळ कशी ओळखणार?
– पनीर भेसळुयक्त आहे की नाही, हे ओळखण्यासाठी ते कुस्करून बघा. जर, पनीर तुटून बारीक व्हायला लागलं तर ते बनावट आहे. कारण त्यात असलेली स्किम्ड मिल्क पावडर जास्त दबाव सहन करू शकत नाही.
– शुद्ध पनीर आणि बनावट पनीरमध्ये एक साधासा फरक आहे तो म्हणजे मऊपणा. शुद्ध पनीर मऊ असतं. पण तुमचं पनीर घट्ट असेल तर ते भेसळयुक्त आहे, हे समजून घ्या. घट्ट पनीर खाताना रबरासारखं स्ट्रेच होऊ शकतं.
– पनीरची ओळखण्याची तिसरी पद्धत म्हणजे आयोडिन टिंचर. सर्वांत आधी पनीर पाण्यात उकळून थंड करा. आता त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका. जर पनीरचा रंग निळा झाला असेल तर ते भेसळयुक्त आहे. भेसळयुक्त पनीर खाणं टाळा, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
अशा रितीने तुम्ही पनीर भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखू शकता. पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय. त्यामुळे पनीर विकत घेतल्यानंतर त्याची तपासणी करून नंतरच पदार्थ बनवा. शिवाय डेअरी प्रॉडक्टमध्येही भेसळीचं प्रमाण वाढत चाललंय, त्यामुळे विश्वासार्ह ठिकाणांहून प्रॉडक्ट्सची खरेदी करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.