चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 9 मे : पुणेकरांवर अखेर पाणी कपातीचं संकट कोसळलं आहे. आठवड्यातील दर गुरूवारी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने राज्य शासनाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात पाणी कपातीवर चर्चा झाली. त्यानंतर पुणे महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे.
18 मे पासून निर्णयाची अंमलबजावणी
तुमच्या शहरातून (पुणे)
खडकवासला साखळी धरणात आजमितीला 9.70 टिएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हाच साठा 9.20 टिएमसी इतका होता. शहराला दररोज 1600 एमएलडी पाणी लागते. दरवर्षी 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करून उपलब्ध धरणसाठ्यातून पुणे महापालिका आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. परंतु, यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाला विलंब होण्याचा तसेच पावसाचे प्रमाण कमी राहाण्याचा अंदाज राष्ट्रीय वेधशाळेने व अन्य हवामान अभ्यासक संस्थांनी वर्तविल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे महापालिकेने 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्याची तयारी केली आहे. या कालावधीत दोन बाष्पीभवन व गळतीतून 2 टीएमसी पाणी खर्ची होईल व धरणांतून पुढील गावांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी सुमारे साडेतीन टीएमसी पाण्याची गरज भासेल. उर्वरित अर्थात 6.25 टीएमसी पाणी 31 ऑगस्टपर्यंत वापरायचे झाल्यास महापालिकेला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवावे लागणार आहे. 18 मे पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
वाचा – Gold Price in Pune : पुण्यात सोन्याचे भाव ही नाहीत उणे, पाहा आज कितीनं महागलं सोनं!
पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
महापालिका स्तरावर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनादेखील पाणी वापराबाबत आवाहन करण्यात येत आहे. उन्हाळ्यात बाग बगिचे, कुलर, दिवसातून दोनतीनदा आंघोळ, गाड्या धुणे या कारणांमुळे पाण्याचा वापर वाढतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी काट कसरीने वापरण्यास सुरुवात करावी, असं आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.