पुणे, 09 मे : एका कारमधून मोठ्या प्रमाणावर रक्कम नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात साडे तीन कोटींची रोकड आढळून आली. रकमेसह पोलिसांनी वाहन जप्त केले असून संशयित व्यक्तीलाही ताब्यात घेतलं आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वाहतूक शाखा, लोणीकाळभोर आणि हडपसर पोलीसांनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलीस चौकशीत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने रकमेबाबत धक्कादायक अशी माहिती दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी वाहतूक शाखा, लोणीकाळभोर आणि हडपसर पोलिस स्टेशन, गुन्हे शाखा युनिय पाच यांना एका गाडीतून मोठ्या प्रमाणावर रोकड नेली जात असल्याचं समजलं होतं. संशयित कार ताब्यात घेऊन पोलिसांनी गाडीसह व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणले. तिथे दोन पंचांमसमोर पंचनामा करून गाडीतील बॅगची तपासणी करण्यात आली. तेव्हा बॅगमध्ये एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये इतकी रोकड आढळून आली.
Video : दिवे घाटामध्ये बाईकला धडक देऊन टँकर दरीत कोसळला; दोनजण जागीच ठार तर 4 गंभीर
तुमच्या शहरातून (पुणे)
पोलिसांनी रोख रक्कम मोजून दोन पंचांसमोर जप्त करून सीलबंद केली. या प्रकरणी प्रशांत धनपाल गांधी (वय 47 वर्षे) याला ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रशांतने त्याचे अनेक व्यवसाय असल्याची माहिती दिलीय. यामध्ये खत व्यवसाय, दूध व्यवसाय, किराणा दुकान व शेती असल्याचं त्याने सांगितलं. इंदापूर तालुक्यातील लासूरणे इथे प्रशांत राहतो.
प्रशांतचे वाहन पोलिसांनी जप्त केलं आहे. तसंच सीआरपीसी कलम 41(D)नुसार कारवाई करण्यात आली आहे. आता रोख रकमेबाबत आयकर विभाग, पुणे यांना पुढील कारवाई करण्यासाठी कळवण्यात आलं आहे. प्रशांतला रकमेबाबत विचारले असता त्याने कर्जाची रक्कम भरायची होती असं सांगितलं. पुण्यातील महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखा, लक्ष्मीरोड इथं रक्कम भरायची असल्याची माहिती त्याने चौकशीवेळी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.