पुणे, 19 मे : पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैद्यांना आता त्यांच्या कुटुंबीयांसोबत कॉल किंवा व्हिडीओ कॉलवर बोलता येणार आहे. कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व तुरुंगात कैद्यांना भेटण्यासाठी कुटुंबीयांची गर्दी उसळत आहे. यातच आता हा निर्णय घेतल्याने कैद्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.
अनेक कैद्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे कुटुंबातील एक किंवा दोनच सदस्य कैद्यांना भेटू शकतात. याशिवाय कैद्यांना त्यांच्या बराकीपासून कॉइन बॉक्सपर्यंतही न्यावं लागतं. सुरक्षेच्या दृष्टीने हेसुद्धा जोखमीचं असतं. मोबाईल कॉलमुळे या धोक्यापासून वाचता येतं. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
कैद्यांना एकाच वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत बोलता येणार आहे आणि पाहताही येईल. मोबाईल सेट तुरुंग प्रशासनाच्या ताब्यात राहील. फक्त कॉल करण्यासाठी कैद्यांना फोन दिला जाईल. येरवडा तुरुंगात सध्या याला सुरुवात करण्यात आलीय. सध्या आठवड्यातून एक दिवस आणि तेसुद्धा फक्त दहा मिनिटे कैदी कॉइन बॉक्सवरून बोलू शकतात. पण त्यांच्या नातेवाईकांना पाहू शकत नाहीत.
कैद्यांना एकाच वेळी कुटुंबातील सगळ्यांशीच बोलता येईल या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे कैदी व त्यांच्या कुटुंबीयांना एकमेकांकडे भावना व्यक्त करता येतील. यामुळे दोघांवरील ताण तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच कारागृहांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.