प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 23 मे : आधुनिक युगात मोबाईल आणि कॉम्पुटरवर घरबसल्या अनेक खेळ खेळता येतात. त्याचबरोबर मैदानी खेळांमध्येही बरीच प्रगती झालीय. पण, पूर्वीच्या काळी ही साधनं मर्यादीत होती. त्या काळी असलेल्या खेळाच्या मनोरंजनाच्या साधनांबाबत आजही मोठं कुतुहल आहे. पुणे जिल्ह्यातल्या पिरंगुट गावाजवळील डोंगर रांगात 2500 वर्ष जुन्या खेळाचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे याबाबतच्या संशोधनाला गती मिळणार आहे.
कुठे मिळाले अवशेष?
तुमच्या शहरातून (पुणे)
पिरंगुट गावच्या दक्षिण डोंगर रांगेत उभेवाडी डोंगरात मंकला या अडीच हजार वर्ष जुन्या खेळाचे अवशेष सापडलेत. ॲड. मारुती गोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अवशेष शोधले आहे. पटराव गोळे आणि त्यांचे धाकटे बंधू मंगेश गोळे नेहमीप्रमाणे या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले असता त्यांना सर्वप्रथम इथे हे अवशेष दिसले. जोरदार पाऊस पडून परिसर स्वच्छ झाल्यामुळे या प्राचीन अवशेषांचे दर्शन घडले. हे अवशेष दृष्टीस पडल्यावर त्यांनी हे फोटो मारूती गोळे यांना पाठवले. मारुती यांनी मंकाला खेळाच्या अभ्यासक सोज्वळ माळी यांच्याकडून हा मंकाला खेळ असल्याची खात्री करून घेतली.
काय आहे मंकला?
मंकाला हा आफ्रिका खंडातील पारंपारिक खेळ आहे. भारतामध्ये 2500 वर्षांपूर्वी हा खेळ खेळला जात असे. प्राचीन काळी खडकांवर मनोरंजनासाठी हे पटखेळ कोरले गेले आहेत. व्यापारी मार्ग, टेहाळणीच्या जागा या ठिकाणी विरंगुळा म्हणून हा खेळ खळला जात असे. या खेळात हत्ती, घोडे देखील पणाला लावले जात. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात या खेळाचे अवशेष सापडतात. महाराष्ट्रातही नाणेघाटापासून ते सिंधुदुर्गाच्या पर्यंतच्या भागात या खेळाचे अवशेष सापडले जातात. आता पिरंगुटमध्येही या खेळाचे अवशेष सापडले आहेत, अशी माहिती मारूती गोळे यांनी दिली.
प्राचीन खेळांची शोधमोहीम
पुणे जिल्ह्यातील मारूंजी टेकडी भागात फेब्रुवारी 2022 मध्ये 41 प्राचीन खेळ शोधण्यात यश आलं होतं. त्यानंतर कापूरोळ इथं 35, वैष्णवधाममध्ये 30 आणि भोर तालुक्या 17 प्राचीन खेळ शोधण्यात आले आहेत. या खेळाची नोंदणी करण्याचं काम ‘प्राचीन पट खेळ संवर्धन मोहीम’ अंतर्गत सुरू असल्याची माहिती गोळे यांनी दिली.
प्राचीन संस्कृती आणि परंपरेचा खेळ हा महत्त्वाचा भाग आहे. परदेशी व्यापारी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरुन जात असल्याचं या संशोधना्तून सिद्ध होतं. या खेळचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. या प्राचीन ठेव्याकडं पुरातत्व विभागानं लक्ष देणं आवश्यक आहे, असं मत संशोधक सोज्वळ माळी यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.