गणेश दुडम, प्रतिनिधी
मावळ, 08 एप्रिल : ‘पुण्यातील भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट कुटुंबीय अद्याप दुःखातून सावरलेलं नाही. त्यामुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही अफवा पसरवू नका. तूर्तास मी ही अशी कोणती चर्चा करणार नाही, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
पुण्यातील मावळमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शिरे-शेटेवाडीतील पुनर्वसन भूखंडाचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलं.
त्यानंतर गिरीश बापटांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण असेल? अशी चर्चा पुणे लोकसभेत रंगलेली आहे. त्याबद्दल विचारले असता बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
गिरीश बापट कुटुंबीय अद्याप दुःखातून सावरलेलं नाही. त्यामुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत तुम्ही काहीही अफवा पसरवू नका. तूर्तास मी ही अशी कोणती चर्चा करणार नाही, असं बावनकुळे म्हणाले.
(मी माणूस आहे…; नॉट रिचेबलच्या चर्चांवर अजित पवार स्पष्टच बोलले)
‘डबल इंजिन सरकार सध्या महाराष्ट्रात कार्यरत असल्याने महाराष्ट्राचा विकास हा होणारच आहे. पण घर कोंबडे आता काहीही बोंबलले तरी आता काही फायदा होणार नाही, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
(अजित पवार खरंच नॉटरिचेबल होते? शरद पवारांनी दोन शब्दात विषय संपवला)
दरम्यान, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. भाजप आणि मविआकडून या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आता उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. भाजपकडून सध्या या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा आहे. त्यामध्ये गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.