हनुमान जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात महाआरती केली. यावेळी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या महाआरतीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी भगवी शाल आणि गदा देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले.
मशिदीवरील भोंगे हटवले नाहित तर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. आज हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील खालकर चौकातील महारूती मंदिरात महाआरती झाली. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे कालच पुण्यात पोहोचले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या या महाआरतीनिमित्त पुण्यात मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करत पोस्टरबाजी केली आहे. गुडीपाडव्यानिमित्त मुंबई आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेतून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता.