छत्रपती संभाजीनगर, 09 मे : टीईटी घोटाळ्यानंतर आता बनावट शैक्षणिक प्रमाणपत्राचा घोटाळा पुण्यात उघडकीस आला आहे. यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बनावट वेबसाईट तयार करून त्यावरून 700 हून अधिक जणांना प्रमाणपत्रे दिल्याचं समोर आलंय. नोकरभरतीसाठी 60 हजार रुपयांत बोगस प्रमाणपत्र दिलं जात होतं. यात दहावी, बारावी पासच्या प्रमाणपत्रांचा समावेश होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून या रॅकेटमधील मुख्य आरोपी हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत.
पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती. दरम्यान, दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, छत्रपती संभाजी नगर), अल्ताफ शेख रा. परांडा जी.धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे. तर टीईटीनंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जातोय.
पुणे : कारमधून जप्त केली साडे तीन कोटींची रोकड, पोलिसांना सांगितलं धक्कादायक कारण
तुमच्या शहरातून (पुणे)
कोण आहे कृष्णा गिरी?
पुणे पोलिसांनी बनावट दहावीचे प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. यातील कृष्णा गिरी हा मुख्य आरोपी आहे. गिरी हा छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथील कृष्णापुरमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वी तो फोटोग्राफरचा व्यवसाय करायचा. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने महाराष्ट्र पब्लिक स्कूल नावाने एक संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना तो पास झाल्याचे प्रमाणपत्र देत होता.
बिडकीनपासून काही अंतरावर असलेल्या चितेगावमध्ये त्याने यासाठी एक कार्यालय देखील सुरू केलं होतं. मुलांच्या ऍडमिशनसाठी तो सोशल मीडियावरून प्रचार देखील करायचा. मात्र आता याच कृष्णा गिरीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील दुसरा आरोपी सय्यद इमरान हा देखील छत्रपती संभाजीनगर मधलाच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.