मुंबई, 19 मे :आजकाल कोणत्याही मार्गाने फसवणूक होऊ शकते. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. गाडीत इंधन भरण्यासाठी आपण पेट्रोल पंपावर जातो. काहीवेळा आपल्याला पंपावर कोणत्या ना कोणत्या कारणाने फसवणूक झाली आहे, असं जाणवतं. पण घाईमुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि निघून जातो. गाडीत इंधन कमी भरणं, पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ असणं, इंधन भरण्याची यंत्रणा सदोष असणं हे सर्व फसवणूकीचे मार्ग आहेत. याशिवाय आणखी एका प्रकारे तुमची पेट्रोल पंपावर फसवणूक होऊ शकते. पेट्रोल, डिझेलच्या शुद्धतेबाबत सरकारने परिमाण निश्चित केले आहे. याला डेन्सिटी म्हणतात. पण त्याविषयी आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक कशी होऊ शकते, ते सविस्तर जाणून घेऊया. `झी न्यूज`ने या विषयीची माहिती दिली आहे.
पेट्रोल पंपावर इंधन चोरी, फसवणूकीविषयी आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. आपल्यापैकी कोणी या गोष्टीला बळीदेखील पडलेला असतो. पेट्रोल पंपावर कशा पद्धतीने फसवणूक होते, या विषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. काही वेळा पंपावरील कर्मचारी हातचलाखी करून कमी इंधन वाहनात भरतात. ते तुम्हाला अशा पद्धतीने फसवतात की ही गोष्ट तुमच्या लक्षातही येत नाही.
कॉर्पोरेट कल्चरला कंटाळून सोडली चांगल्या पगाराची नोकरी, आता तंबूमध्ये राहून आराम करतोय तरुण
पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्यापूर्वी आपण पेट्रोल भरण्याच्या यंत्रावरील झिरोकडे लक्ष देतो. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण झिरोकडे लक्ष न दिल्यास कमी इंधन भरले जात फसवणूक होण्याची शक्यता असते. याशिवाय या यंत्रावर नमूद डेन्सिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डेन्सिटीविषयी माहिती नसल्यास तुमचे वाहन खराब होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसू शकतो. डेन्सिटी ही पेट्रोल किंवा डिझेलच्या शुद्धतेशी संबंधित असते. या विषयी सरकारने परिमाण निश्चित केलेले असते. योग्य डेन्सिटी नसलेले इंधन वाहनात भरले तर वाहनाचे मोठे नुकसान होते.
फसवणूकीचा खरा खेळ हा पेट्रोल,डिझेलच्या डेन्सिटीमध्ये दडलेला आहे. इंधन भरण्याच्या यंत्रावर तीन मीटर असतात. त्यात एक रकमेचे, दुसरे व्हॉल्युमचे आणि तिसरे डेन्सिटीचे मीटर असते. पेट्रोल डेन्सिटीची रेंज 730 ते 770 kg/m3 असते. डिझेल डेन्सिटीची रेंज 820 ते 860 kg/m3 असते. पण जर पंपावरील यंत्रावर ही रेंज कमी किंवा जास्त दाखवली गेली असेल तर याचा अर्थ पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ आहे, असं समजावं. जर ही रेंज कमी असेल तर पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ ही असू शकते. त्यामुळे तुमचे मोठी फसवणूक होऊ शकते. तसेच गाडीचे इंजिन लवकर खराब होऊ शकते.जर ही डेन्सिटी रेंज जास्त असेल तर इंधनात भेसळ आहे, असे समजावे. यामुळे तुमच्या वाहनातील इंजिन वरचा दबाव वाढतो. मायलेज देखील कमी मिळते. यामुळे इंजिनचे आयुष्य कमी होते. त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी पेट्रोल पंपावर गेल्यावर सर्व बाबी बारकाईने तपासून वाहनात इंधन भरावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.