अल्बर्टा (कॅनडा), 8 एप्रिल : प्रेमप्रकरणांमध्ये काही तरुणांचे हकनाक बळी जातात. आयुष्यंही उद्ध्वस्त होतात; मात्र प्रेमप्रकरणात मुलगी आपल्याच कुटुंबाची हत्या करते असं कधी ऐकलंय का? ही 2006 सालातली कॅनडामधली ट्रिपल मर्डर केस आहे. बॉयफ्रेंडला रक्ताची चव आवडते म्हणून एका तरुणीने आई-वडील आणि भावाला संपवल्याची ही घटना वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ‘आज तक’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मार्क रिचर्डसन यांचं कुटुंब कॅनडातल्या अल्बर्टा प्रांतातल्या मॅडिसन शहरात राहायचं. हे मध्यमवर्गीय कुटुंब सगळ्यांशी हसून खेळून वागायचं. मार्क कंपनीत टेक्निशियन होते. त्यांची पत्नी डेब्रा घर सांभाळायची. मुलगा जेकब जवळच्याच शाळेत होता, तर 12 वर्षांची मलगी जॅस्मिन कॅथलिक गर्ल्स स्कूलमध्ये शिकत होती. ती सुंदर होती. फिरायला जाणं, संगीत ऐकणं आणि मित्रांबरोबर पार्टीला जायला तिला आवडायचं.
डेली स्टारच्या माहितीनुसार, 2005मध्ये ती पार्टीला गेली असताना तिला एक मुलगा खूप आवडला. त्याचं नाव जेरेमी स्टेंकी असं होतं. तो इतरांपेक्षा वेगळा होता. पार्टीमध्ये जॅस्मिनने त्याच्याशी बोलणं सुरू केलं. दोघांनी सोशल मीडिया प्रोफाइल्स शेअर केली. हळूहळू दोघांमधला संवाद वाढत होता. सोशल मीडिया अकाउंटवर जॅस्मिनने तिचं वय 15, तर नाव ‘रनिंग डेव्हिल’ असं लिहिलं होतं. दोघांनी हळूहळू भेटणं सुरू केलं. त्यांच्यात शारीरिक जवळीकही वाढली होती; मात्र काहीच दिवसांत जॅस्मिनच्या आई-वडिलांना त्यांच्या अफेअरबद्दल समजलं. त्यांनी तिला समजावलं; मात्र या घटनेनंतर घरातलं वातावरण बिघडलं होतं.
24 एप्रिल 2006 रोजी दुपारी एक वाजता जॅस्मिनच्या दारावरची घंटी वाजली. जेकबच्या मित्राने खूप वेळा दार वाजवूनही ते उघडलं न गेल्यानं तो शेवटी खिडकीतून डोकावला. समोर डेब्राचा मृतदेह पडलेला पाहून तो थेट त्याच्या घरी गेला. त्याच्या आईने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घरी जाऊन दार तोडलं, तेव्हा त्यांना मार्क आणि डेब्रा यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. मार्कजवळ एक चाकू आणि स्क्रू ड्रायव्हर पडला होता. वरच्या मजल्यावर जेकबचा मृतदेह सापडला; मात्र जॅस्मिनचा काहीच पत्ता नव्हता. पोलिसांना वाटलं, जॅस्मिनचं अपहरण झालं किंवा तिलाही मारून लांब टाकलं असेल. त्यांनी जॅस्मिनच्या शाळेत चौकशी केली, तेव्हा त्यांना जॅस्मिनच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. दोघांचं सोशल मीडियावरचं चॅट पाहून पोलीस अवाक झाले. हत्येचा संशय त्या दोघांवरच गेला.
लवकरच पोलिसांना जॅस्मिन आणि जेरेमी सापडले. जेरेमी 23 वर्षांचा होता. दोघांनी हत्येचा कबुलीजबाब दिला; मात्र खुनाचं कारण ऐकून पोलिसांना धक्का बसला. बॉयफ्रेंडला रक्ताची चव आवडत असल्याने हे खून केल्याचं जॅस्मिननं सांगितलं. जेरेमीच्या गळ्यात एक तारनुमा माळ असे. त्यात रक्त भरलेलं असतं. तसंच तो 300 वर्षांपूर्वीचा लांडगा असल्याचंही त्यानं जॅस्मिनला सांगितलं होतं.
हे ऐकून जॅस्मिन त्याच्या आणखीच प्रेमात पडली होती. आई-वडील त्यांना भेटू देत नसल्याने दोघांनी त्यांना संपवण्याचा कट केला व 23 एप्रिलला ते ‘नॅचरल बॉर्न किलर’ नावाचा चित्रपट पाहण्यास गेले. त्याच रात्री जेरेमीने मार्क, डेब्रा आणि जेकब यांच्यावर चाकूचे वार करून त्यांना संपवलं. डेब्रा हिच्यावर 12 वेळा, तर मार्क यांच्यावर 24 वेळा चाकूचे वार करण्यात आले. आवाज ऐकून झोपेतून उठलेल्या जेकबला जॅस्मिनने 8 वेळा चाकूचे वार करून संपवलं. त्यानंतर त्यांचं रक्त जेरेमीनं माळेत भरलं व ते तिथून पसार झाले.
जेरेमीला डिसेंबर 2008मध्ये न्यायालयानं 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. जॅस्मिनला 2007मध्ये 10 वर्षांची शिक्षा देण्यात आली. तिची वागणूक चांगली असल्याने न्यायालयाने तिला 9 वर्षांनीच मुक्त केलं. पोलिसांनी घटनेनंतर काहीच दिवसांत या तिहेरी खुनाचं रहस्य सोडवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.