बंगळुरू 13 मे : कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच जोरदार प्रचाराला सुरुवात झाली होती. यावेळी महाराष्ट्रातील काही नेत्यांनीही आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी जोर लावला होता. कर्नाटकात दावणगिरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची प्रचाराची जबाबदारी प्रणिती शिंदे यांच्याकडे होती. आता या मतदारसंघात काँग्रेसला मोठा विजय मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.
दावणगिरी मतदारसंघातील 8 पैकी 6 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या सहा आमदारांनी आघाडी घेतल्याने भाजपला इथे मोठा धक्का बसला आहे. प्रचारावेळी त्यांना नागरिकांच्या रोषाचाही सामना करावा लागला होता. देसुरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिंदे यांच्या सभा स्थळी घोषणाबाजी करत सभा उधळूण लावण्यात आली. ग्रामस्थांचा विरोध पाहून सभा न घेताच प्रणिती शिंदे यांना माघारी परतावं लागलं होतं. मात्र या सगळ्या घटनांनंतरही काँग्रेसचे आमदार आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
कर्नाटकातील सध्याची परिस्थिती –
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली असून स्वबळावर सत्ता स्थापन करेल असं चित्र निर्माण झालं आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निघालेल्या कर्नाटकातील 7 जिल्ह्यांतील विधानसभेच्या 51 पैकी 37 जागांवर काँग्रेस विजयी होताना दिसत आहे. कर्नाटक काँग्रेस राज्य पक्ष कार्यालयाच्या परिसरात पोलिसांच्या वतीने सुरक्षा वाढवण्यात आली. संपूर्ण परिसराला बॅरिकेट लावण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.