शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्यांच्याशी संबंधित ईडीने 2 फ्लॅट आणि एक जमीन जप्त केली आहे. या जप्त केलेल्या प्रॅापर्टीची किंमत 11.35 कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानिमित्ताने प्रताप सरनाईक हे पुन्हा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पासून शिवसेना ते थेट आमदार नक्की कसा आहे प्रताप सरनाईक यांचा प्रवास जाणून घेऊया
वैयक्तिक माहिती –
प्रताप सरनाईक यांचा जन्म 1964 साली वर्धा जिल्ह्यात इंदिराबाई आणि बाबुराव सरनाईक यांच्या पोटी झाला. मग हे कुटुंब मुंबईतील दादरमध्ये स्थलांतरित झालं. तिथून मग ते ठाण्यात स्थलांतरीत झालं. बाबूराव सरनाईक हे तेच आहेत जे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे सहकारी होते. बाबूराव सरनाईक यांनी आचार्य अत्रेंच्या ‘दैनिक मराठा’मध्ये मुख्य मुद्रितशोधक म्हणून काम केलं होतं. अत्रेंवरील त्यांचं ‘तो एक तळपता सूर्य’ हे पुस्तक खूप गाजलं.
प्रताप सरनाईक यांचं कुटुंब राजकारणात आहे. स्वत: प्रताप सरनाईक आमदार आहेत, पत्नी परिषा सरनाईक या नगरसेविका, तर दोन्ही मुले विहंग आणि पूर्वेश हे राजकारणात सक्रीय आहेत.
प्रताप सरनाईक यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांच्या व्यावसायिक कामांची सुद्धा नेहमी चर्चा होत राहते. बांधकाम क्षेत्रातील त्यांची कामगिरी नेहमीच चर्चेत असते. बांधकाम आणि हॉटेलिंग क्षेत्रातील ‘विहंग ग्रुप ऑफ कंपनी’चे प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत.
तसंच, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन ते करतात. यातील दहीहंडीचं आयोजन अनेकांना परिचितही आहे.
राजकीय प्रवास –
आधी ठाण्यातील बांधकाम व्यवसायात नाव कमावलेल्या प्रताप सरनाईक यांनी 1997 साली राजकारणात प्रवेश केला. 1997 सालच्या ठाणे महापालिका निवडणुकीत ते विजय होऊन पहिल्यांदा नगरसेवक झाले. ठाणे महापालिकेत ते सलग दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले.
मग 2008 साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवळा-माजीवडा मतदारसंघातून आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते सलग तीनवेळा म्हणजे 2009, 2014 आणि 2019 साली आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले.
प्रताप सरनाईक यांची राजकीय कारकीर्द वीस-पंचवीस वर्षांची आहे. या काळात त्यांची अशाप्रकारे चौकशी कधीच झाली नसल्याचं समोर येत आहे. पण आता मात्र, प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. यात त्यांची 11.35 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाली आहे. यामुळे, प्रताप सरनाईक पुढे काय करणार, त्यांच्या घरच्यांपैकी कोणी ईडीच्या किंवा आयकर विभागाच्या रडारवर आहे का अशा अनेक प्रश्नांना सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरात उधाण आले आहे.