ऋचा कानोलकर, प्रतिनिधी
मुंबई, 4 एप्रिल : गेल्या काही वर्षात भारतातील अनेक शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, अद्याप प्रदूषण रोखण्यात यश आले नाही. मुंबई शहर देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडलं आहे. धूर, प्रदूषित हवा अनेकांच्या आजारपणाचं कारणं ठरत आहे. सर्वात प्रदूषित दिल्ली शहरालाही मुंबईनं मागे टाकलं आहे. आता यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेनं नवा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईमध्ये 19 प्युरिफिकेशन युनिट बसवले जाणारेत आणि सोबत 14 स्मॉग टॉवर्सही उभारण्यात येणार आहेत. मात्र, यावर शंका घेतली जात आहे.
काय आहे स्मॉग टॉवर?
तुमच्या शहरातून (मुंबई)
स्मॉग टॉवर एक नियंत्रण यंत्र आहे, जे यंत्राच्या सभोवतालची हवा काही प्रमाणात शुद्ध करू शकतं. यंत्र लावलेल्या भोवतालची हवा यात शोषली जाते आणि शुद्ध हवा त्यातून बाहेर सोडली जाते. हवेतील धूलिकण, विषारी वायू प्रदूषित हवेतून वेगळे होऊन शुद्ध हवा बाहेर पडते.
गेल्या ४ वर्षातील हवेची गुणवत्ता:
नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2020 – 17 दिवस गुणवत्ता खराब आणि अतिशय खराब
नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 – 39 दिवस गुणवत्ता खराब ते अतिशय खराब
नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 – 30 दिवस गुणवत्ता खराब ते अतिशय खराब
नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 यादरम्यान ५६ दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब दर्जाची होती.
तज्ज्ञांच्या मते टॉवर्स मुंबईसाठी पुरेसे नाही
“स्मॉग टॉवर्सचा उपयोग मर्यादित स्वरुपाचा असतो, मुंबईसारख्या भव्य शहरात लोकसंख्या प्रचंड आहे, वाहनांची गर्दी आहे, अशा ठिकाणी स्मॉग टॉवर्सचा तितका परिणाम होऊ शकत नाही. माझ्या मते प्रदूषणाची जी उगमस्थानं आहेत तिथेच जर या प्रदूषणाला रोखता आलं तर ते जास्त मदतीचं ठरेल”, असं मत प्रकृती एज्युकेशन आणि रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
वाचा – अशीही ‘भुताची’ मुंबई, ‘या’ 10 ठिकाणांबद्दल वाचून घराबाहेर पडणार नाही तुम्ही PHOTOS
मुंबईतील हवेची गुणवत्ता वारंवार खालावतेय, त्यावर नियंत्रण मिळवण्याकरिता दिल्लीप्रमाणे स्मॉग टॉवर लावण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे, हे स्मॉग टॉवर प्रदूषित हवा शोशून ती शुद्ध करून बाहेर सोडतात. मात्र, वैज्ञानिकांचं मते मुंबईमध्ये सध्या हे टॉवर लावणं गरजेचं नाही. याचं कारण म्हणजे दिल्लीच्या कनॉट प्लेस आणि आनंद विहार इथं दोन स्मॉग टॉवर लावले गेले, ज्याचा खर्च 20 कोटी रुपयांपर्यंत गेला. प्रदूषण नियंत्रणासाठी ही पद्धत काही फारशी कामी आली नाही, आता मुंबईमध्ये 19 प्युरिफेकेशन युनिट आणि 14 स्मॉग टॉवर्स बसवण्याचा मुंबई महापालिकेचा मानसे, एअर फिल्टरचे प्युरिफायर दर 3-4 महिन्यांनी बदलावे लागतात, ज्याला 1 ते दीड कोटी वर्षाला खर्च होतो, त्यामुळे दिल्लीमध्ये फारसा परिणाम न दिसल्यानं मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्युरिफायर बसवणं अत्यंत खर्चिक होईल असं वैज्ञानिकांचं मत आहे.
मुंबईत प्रदूषण वाढण्याची कारणं
कारखान्यातून येणारा धूर,
जंगलतोड,
वाहनांची वाढती संख्या,
उघड्यावर जाळला जाणारा कचरा
लाकूड आणि कोळशाचा इंधन म्हणून वापर
जीवाश्म इंधनाचा वापर
आणि महत्त्वाचं म्हणजे बांधकाम व पाडकामामुळे होणारं धुळीचं प्रदूषण
मुंबईला या प्रदूषणाच्या विळख्यातून लगेच बाहेर पडणं सोपं नाही, मात्र प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी खर्च करून प्युरिफायर, स्मॉग टॉवर बसवण्यापेक्षा प्रदूषणाचे स्रोत नियंत्रणात आणणं जास्त गरजेचंय असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचसोबत समाजाचा भाग म्हणून नागरिकांनीसुद्धा आपल्या परिनं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
प्रदूषणाचा आलेख हा उच्चांकाकडेच जातोय, मुंबईत रस्त्यारस्त्यावर कॉंक्रिटीकरण सुरूय, खड्डे, पाईपलाईन दुरुस्तीचं काम चालू आहेत, कोस्टल रोड, मुंबई मेट्रोसारखे विकासप्रकल्प सुरू आहेत अशात मुंबईतल्या प्रदूषणातून मोकळा श्वास मुंबईकरांना घेता येत नाही. बांधकामाच्या जागी स्क्रबरचा वापर, धूळ उडू नये म्हणून जागा झाकणं, रेडी मिक्स कॉंक्रीट प्लांटमधून उडणारी धूळ स्क्रबर वापरून नियंत्रित करणं, काम झाल्यानंतर पाण्याचे फवारे मारणं असे काही उपाय प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, ज्यामुळे ही प्रदूषित हवा लोकांपर्यंत पोहोचण्याअगोदर रोखली जाऊ शकेल.
दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी राबवण्यात आलेला प्रयत्न अपयशी ठरला असताना मुंबईमध्ये तेच मॉडेल उभं करणं आणि त्यासाठी कोट्यवधींचा खर्च करणं खरंच गरजेचं आहे का याबाबत मुंबई महापालिकेनं पुनर्विचार करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.