पॅरिस (फ्रान्स), 4 एप्रिल : सिनेसृष्टी किंवा फॅशन जगताशी संबंधित एखाद्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर अभिनेते, अभिनेत्री किंवा मॉडेल्सचे फोटो प्रकाशित होणं यात फारसं नाविन्य नाही. मात्र, काही भारतीय अभिनेते, अभिनेत्री किंवा मॉडेल आक्षेपार्ह फोटोंमुळे वादात सापडल्याचं आपण पाहिलं आहे. फ्रान्समध्ये यासंबंधी काहीशी वेगळी घटना घडली आहे. फ्रान्स सरकारमधील एका महिला मंत्र्याचा फोटो प्लेबॉय नावाच्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाला आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह सरकारमधील अन्य काही मंत्री संतप्त झाले असून, या महिला मंत्र्यावर जोरदार टीका होत आहे. फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या निर्णयांविरोधात संप आणि हिंसक आंदोलनं सुरू असताना महिला मंत्र्याच्या या कृत्यामुळे सरकारमधील काही सहकारी चिडले आहेत. हा प्रकार नेमका काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.
40 वर्षीय मार्लेन शियाप्पा या स्त्रीवादी लेखिका म्हणून ओळखल्या जातात. ग्लॅमर जगतातील प्रसिद्ध नियतकालिक असलेल्या प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर नुकताच मार्लेन यांचा एक फोटो प्रकाशित झाला आहे. प्लेबॉय हे मासिक जगभरात सेक्ससंबंधी भडक फोटो आणि मजकूर छापणारं मासिक म्हणून ओळखलं जातं. याशिवाय त्यांनी या नियतकालिकास सविस्तर मुलाखत दिली असून, त्यात महिला आणि समलैंगिकांचे हक्क, गर्भपातासारख्या विषयांवर भाष्य केलं आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शियाप्पा यांना दोन मुलं आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर होत्या. मातृत्व, महिलांचं आरोग्य आणि गर्भधारणा यातील आव्हानांबद्दल त्यांनी लेखन केलं आहे. 2010 मध्ये शियाप्पा यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी लठ्ठ असणाऱ्यांसाठी काही लैंगिक टिप्स दिल्या होत्या. मात्र समीक्षकांनी हे पुस्तक स्टिरियोटाइपचा प्रचार करणारे असल्याचे म्हटलं होतं.प्लेबॉय नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर शियाप्पा यांचा फोटो प्रकाशित झाल्याने फ्रान्समध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Electric Scooters : ‘या’ 3 इलेक्ट्रिक स्कूटर्सना तोडच नाय! किंमत बजेटमध्ये अन् फीचर्सही झक्कास
फ्रान्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्याच्या योजनांविरोधात संप आणि वाढत्या हिंसक निदर्शनांचा सामना सरकारला करावा लागत आहे. त्यातच शियाप्पा यांच्या या कृतीमुळे सरकारमधील काही सहकारी चिडले आहेत. प्लेबॉयसाठी पोझ देणं हे स्त्रीवादी असू शकतं का? असा सवाल करत मंत्री शियाप्पा यांनी पूर्ण कपड्यातील फोटोबाबतच्या आपल्या निर्णयाचा बचाव केला आहे. मात्र सामजिक अर्थव्यवस्था आणि संघटना विषयाच्या मंत्री असलेल्या मार्लेन यांनी प्रसिद्धीसाठी स्टंट केला आहे, असं पंतप्रधान आणि डाव्या विचारसरणीच्या टीकाकारांना वाटतंय. 2017 मध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांना काही कारणास्तव दूर ठेवलं होतं. स्त्रीवादी लेखिका म्हणून ओळख असलेल्या मार्लेन या कायमच वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यांनी वारंवार उजव्या विचारसरणीवर रोष व्यक्त केला आहे.
या वादाविषयी मार्लेन यांनी शनिवारी एक ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटलं आहे की “ प्रत्येक ठिकाणी आणि कायमच स्त्रियांनी त्यांच्या शरीराबाबत काय निर्णय घ्यायचे हा त्यांचा जो अधिकार आहे त्याचं संरक्षण मी करत आहे. फ्रान्समध्ये स्त्रिया मुक्त आहेत. मग त्याचे रेट्रोग्रेड्स किंवा हिप्पोक्रॅट्सना त्रास होवो न होवो.“ पंतप्रधान एलिथाबेथ बोर्न या पदावर विराजमान होणारी आतापर्यंतची दुसरी महिला आहे. बोर्न यांनी शियाप्पा यांच्याशी फोनवरून या संदर्भात संवाद साधला. “सध्याच्या काळात हे कृत्य अजिबात योग्य नाही,“ असं त्यांनी शियप्पांना सांगितल्याचं त्यांच्या सहाय्यकानं शनिवारी `एएफपी`ला सांगितलं.
“यात फ्रेंच लोकांचा आदर कुठे आहे,“ असा सवाल ग्रीन्सच्या खासदार आणि सहकारी महिला हक्क कार्यकर्त्या, मध्यवर्ती सरकारच्या टीकाकार सँड्रिन रुसो यांनी उपस्थित केला आहे. “जे निदर्शनं करत आहेत, ज्यांचे पगार कमी होत आहेत, ज्यांना महागाईमुळे जेवणाची व्यवस्था नाही, अशा लोकांना अशा स्थितीत आणखी दोन वर्ष काम करावे लागणार आहे, असे त्यांनी बीएफएम वाहिनीशी बोलताना सांगितले. महिलांचं शरीर कुठेही एक्सपोज करता यावं, मला त्यात काही अडचण नाही, पण या मागे एक सामजिक संदर्भ आहे, “असं त्यांनी स्पष्ट केलं.
ग्लॅमर मॅगझिनसाठी डिझायनर कपडे परिधान केलेल्या शियाप्पांचे फोटो काहींना चुकीचा संदेश देणारे वाटले. “मी पहिल्यांदा याबद्दल ऐकले तेव्हा मला हा एप्रिल फूल विनोद वाटला,“ अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीनं दिली आहे. शियाप्पावरील इतर टीका ही केंद्र सरकारच्या संवाद धोरणाच्या व्यापक मुद्द्यावर केंद्रित आहे.
फ्रेंच प्रेसला क्वचित मुलाखती देणाऱ्या मॅक्रॉन यांनी गेल्या आठवड्यात `पिफ ले मॅग` या मुलांसाठी असलेल्या मासिकाला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी राजकीय शक्ती आणि पेन्शन या विषयांवर आपले मत मांडले होते. दुसरीकडे शियाप्पा या फ्रेंच टीव्हीवरील टॉक शोमध्ये नियमित संवाद साधतात. त्यात त्यांनी 2018 मध्ये समानता मंत्री म्हणून काम करताना कॅटकॉलिंग आणि रस्त्यावर होणार छळ रोखण्यासाठी कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, शियाप्पा प्रकरणावर प्लेबॉय नियतकालिकानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांची ही भूमिका प्लेबॉयच्या फ्रेंच आवृत्तीत प्रकाशित झाली आहे. त्यात त्यांनी `हे सॉफ्ट पॉर्न नाही`, असं म्हटलं आहे. “शियाप्पा या प्लेबॉयच्या विचारांशी सुसंगत अशा सरकारी मंत्र्यापैकी एक आहेत. कारण त्या महिलांच्या हक्कांशी संलग्न आहे. पुरुषत्वाचा अभिमान दाखवणाऱ्या जुन्या विचारांचे हे मासिक नाही तर ते स्त्रीवादी कारणांसाठी एक साधन असू शकते, असं त्यांना समजलं आहे,“ अशी प्रतिक्रिया प्लेबॉयचे संपादक जीन-क्रिस्टोफ फ्लोरेंटिन यांनी `एएफपी`शी बोलताना दिली.
ते म्हणाले की, “प्लेबॉय हे सॉफ्ट पॉर्न मासिक नाही तर 300 पानांचे त्रैमासिक मॉक (बुक आणि मॅगेझिन यांचे मिश्रण) आहे. त्यात बौद्धिक आणि प्रचलित कंटेंट आहे. अजूनही मासिकाच्या मुखपृष्ठावर कमी कपड्यांतील स्त्रियांचे फोटो छापले जातात हे मी मान्य करतो पण सगळ्या मासिकात असेच फोटो असतात असं नाही.“
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.