मुझफ्फरपूर, 1 मे : काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील न्यायालयात धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली. शास्त्री यांनी स्वत:ला हनुमानाचा अवतार सांगून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे अर्जात म्हटले आहे. मुझफ्फरपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (पश्चिम) यांच्या न्यायालयात स्थानिक वकील सूरज कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, धीरेंद्र शास्त्री यांनी 24 एप्रिल रोजी राजस्थानमधील एका मेळाव्यात भगवान हनुमानाचा ‘अवतार’ असल्याचा दावा केला होता, जो हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान होता.
त्यांनी शास्त्री यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 295A (धार्मिक श्रद्धांचा अपमान), 298 (धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असलेले शब्द) आणि 505 (खोटी माहिती, ज्याने इतरांना त्रास होऊ शकतो) अंतर्गत खटला दाखल करण्याची विनंती केली. या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयाने 10 मे ही तारीख निश्चित केली आहे. योगायोगाने, धीरेंद्र 13 मे पासून पाटणा येथे पाच दिवसीय ‘मंडली’ आयोजित करणार आहेत. परंतु, त्यांच्या प्रस्तावित भेटीला राज्यातील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दल (राजद) च्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला आहे.
वाचा – धक्कादायक! वाहनात हवा भरली नाही म्हणून पंक्चर दुकानदारालाच संपवलं
बिहारचे पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव, जे स्वतः अत्यंत धार्मिक समजले जातात, त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीला विरोध करण्याचा आणि पाटणा विमानतळावरच त्यांचा घेराव करण्याची भाषा केली आहे. हनुमानाला समर्पित असलेल्या बागेश्वर धाम तीर्थक्षेत्राचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्याविरुद्ध मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी जातीय भावना भडकवल्याचा आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.