भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी
ठाणे, 8 मे : काही रेकॉर्ड केल्यानंतरही ते खरंच करण्यात आलेत यावर विश्वास बसत नाही. ठाण्यात रविवारी झालेला एक वर्ल्ड रेकॉर्डही असाच आहे. हा रेकॉर्ड ऐकल्यानंतर तुम्हाला कसं शक्य आहे? असा प्रश्न पडेल. तुमच्या पोटात गोळा येईल, पण हे प्रत्यक्ष घडलंय. नवी मुंबईत राहणाऱ्या पंडित धायगुडे यांनी तब्बल 377 वेळा जड वजनाची दुचाकी अंगावरुन नेत स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे.
कसा केला रेकॉर्ड?
तुमच्या शहरातून (मुंबई)
पंडित धायगुडे हे मुळचे सांगलीमधील आहेत. ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई म्हणून नोकरी करतात. नोकरी करत असतानाच त्यांनी आवड म्हणून कराटेचं प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. धायगुडेंना कराटेची गोडी वाढली. त्यामध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला. त्यानंतरही त्यांनी व्यायाम आणि सराव सुरूच ठेवला.
त्यांना 2009 पासून एका वेगळ्याच ध्यासाने झपाटले. त्यांनी आपल्या अंगावरून वजनी गाड्या घेऊन जायचे ठरवले आणि त्यासाठी सराव सुरू केला. धायगुडे यांनी यापूर्वी 257 किलो वजनाच्या दोन बाईक लागोपाठ 122 वेळा आपल्या पोटावरुन जाऊ देत वर्ल्ड रेकॉर्ड केला.
स्वतःचाच रेकॉर्ड मोडला
धायगुडे यांचं या रेकॉर्डनं समाधान झालं नव्हतं. त्यांनी रविवारी स्वत:चाच विक्रम मोडला. ठाण्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात 257 किलो वजनाचा सहा बाईक एकापाठोपाठ तब्बल 377 वेळा त्यांनी जाऊ दिला. सर्वात शेवटी तब्बल 450 किलो वजनाची इंडियाज स्कॉटाची गाडी धायगुडेंच्या अंगावरुन गेली आणि एकच जल्लोष झाला.
कशी आहे दिनचर्या?
धायगुडे यांचा दिवस सकाळी 4 वाजताच सुरू होतो. त्यानंतर ते व्यायाम करत कराटेचाही सराव करतात. त्यानंतर ते ठाण्यात कार्यालयात जाण्यासाठी निघतात. संध्याकाळी कार्यालयीन कामकाज झाल्यानंतरही ते पुन्हा व्यायाम करतात. मी या पद्धतीचा व्यायाम करण्याची सुरुवात खूप आधीच केली होती. त्यामुळे आता त्याची सवय झाली आहे. मी प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण घेऊनच हा सराव केल्याचं धायगुडे यांनी यावेळी सांगितलं.
टाटांच्या गाड्यांना आता मराठी माणसाने बनवलेला लागणार पार्ट, तब्बल 13 कोटींना घेतलं पेटंट!
मी या रेकॉर्डसाठी 2009 पासून प्रयत्न करत होतो. ते स्वप्न पूर्ण झाल्यानं मी भरुन पावलो. मला या वर्ल्ड रेकॉर्डसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, अशी भावना धायगुडे यांनी व्यक्त केली. त्याचबरोर बँकेनं धायगुडे यांना नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला आहे. हा रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांना एक पगाराचा बोनस देऊ, अशी घोषणा बँकेच्या संचालकांनी यावेळी केली.
विशेष सूचना : पंडित धायगुडे यांनी हा रेकॉर्ड संपूर्ण प्रशिक्षण घेऊन, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करुन केला आहे. कृपया या प्रयोगाचे कुणीही अनुकरण करू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.