मुंबई, 26 एप्रिल : बारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडीत फूट पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. ठाकरे गटाचा विरोध असतानाच शरद पवार आणि सामंतांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मतभेद समोर येणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या माहितीमुळे भूकंप आला आहे. शरद पवारांनी बारसू रिफायनरीला समर्थन दिल्याची माहिती उदय सामंतांनी दिली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा रिफायनरीला विरोध असतानाच शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धडकीच भरली आहे. बारसू रिफायनरीबाबत सकारात्मक पावलं उचलली जात असल्याची माहिती उदय सामंत यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर दिली. तसंच प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू नसून माती परीक्षण सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बारसू रिफायनरीला स्थानिकांनी विरोध दर्शवलाय. त्यामुळे उदय सामंत यांच्यासोबतच्या भेटीत शरद पवारांनी विरोधकांची समजूत काढा अशी भूमिका घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन, प्रकल्पासाठी घाईत निर्णय घेऊ नका, असा सल्ला दिला. स्थानिकांसोबत बैठका घेऊन त्यांना विश्वासात घेणं महत्त्वाचं असल्या मुद्दाही शरद पवारांनी मांडला.
बारसू प्रकल्पावरून फक्त महाविकासआघाडीच नाही तर ठाकरे गटातही मतभेद असल्याचं दिसत आहे. रत्नागिरीतल्या बारसू रिफायनरीविरोधात ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे.
खासदार विनायक राऊत रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या भेटीला पोहोचले. या ठिकाणी सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला. तर दुसरीकडे राजापूरचे आमदार राजन साळवींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थन दिलंय.
कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच….
माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये…. @samant_uday @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
— M L A Rajan Salvi (@MLARajanSalvi) April 26, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.