दिल्ली, 29 एप्रिल : महिला कुस्तीपट्टूंच्या तक्रारीनंतर आता दिल्ली पोलिसांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंहविरुद्ध दोन एफआयआर दाखल केल्या आहेत. पोलिसांनी एक गुन्हा पोक्सो कायद्यांतर्गत तर दुसरा छेडछाडीच्या कलमांतर्गत दाखल करून घेतला आहे. महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने बृजभूषण शरण सिंहवर एफआयआर दाखल करावा असं म्हटलं होतं.
गेल्या शुक्रवारी 7 महिला कुस्तीपट्टूंनी तक्रार दिली होती. यात एक कुस्तीपट्टू अल्पवयीन आहे. गुन्हा दाखल न झाल्याने सोमवारी कुस्तीपट्टूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तक्रारीच्या एक आठवड्यानंतर 28 एप्रिलला सॉलिसिटर जनरलनी न्यायायलयात आज गुन्हा दाखल होईल असं म्हटलं होतं. यानंतर दिल्ली पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली दोन गुन्हे नोंद केले.
न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय हे पाहणं वेदनादायी; कुस्तीपटूंसाठी नीरज चोप्रा मैदानात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिस सर्व पीडितांचे जबाब नोंदवेल. गरज पडल्यास काही जबाब न्यायालयासमोर घेतले जाऊ शकतात. यानंतर पोलिस जबाबाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करेल. तक्रारीत ज्या जागा, शहराचा उल्लेख केला असेल त्या ठिकाणी जाऊन दिल्ली पोलीस तपास करेल.
न्यायालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं की,”न्यायालयाने जो निर्णय दिलाय मी त्याचं स्वागत करतो. मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आणि पोलिस तपासावर विश्वास आहे. तपासात जिथे माझ्या सहकार्याची गरज असेल तिथे करेन.”
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटलं की, आम्ही एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. तर कुस्तीपट्टूंची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं की, “आम्ही दोन कारणांनी चिंतित आहे. एक सुरक्षा आणि दुसरं आरोपीविरुद्ध 40 केसेस आहेत. मी तुम्हाला यादी देईन.” दरम्यान, महिला कुस्तीपट्टूंनी म्हटलं की, आमचा दिल्ली पोलिसांवर विश्वास नाही. ते या प्रकरणी कमकुवत एफआयआर दाखल करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.