बेळगाव 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काहीच वेळात सुरू होणार आहे. 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या दोन्ही पक्षांतील नेत्यांचं निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र, इतरही काही पक्ष आहेत, जे सध्या चर्चेत आहेत आणि लक्ष वेधत आहेत. यातीलच एक म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती.
बेळगावमध्ये मराठी माणसाची ओळख असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने एकूण पाच जागांवर निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळणार असल्याचा अंदाज आहे. पाचपैकी दोन ते तीन जागावर महाराष्ट्र एकीकरण समिती जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आता थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहेत.
एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात –
मतदानानंतर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभा असल्याचा अंदाज वर्तवला गेला. C-Voter, Lokniti-CSDS, Axis My India आणि Today’s Chanakya ने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी संध्याकाळी त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. या महापोलच्या अंदाजावरून राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली असली तरी दोन्ही पक्षांना बहुमताचा जादुई आकडा पार करता येणार नाही, हे अगदी स्पष्ट झालं. दुसरीकडे, राज्यातील तिसरा मोठा पक्ष जेडीएस येथे किंगमेकरची भूमिका बजावू शकतो.
दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी वेगळाच दावा केला आहे. त्रिशंकू विधानसभेची शक्यता नाकारत, पक्षाला 141 जागा जिंकून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “इथे प्रत्येक घरातील लोक काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांनी निवडणूक लढवली.” शिवकुमार यांनी कनकापुरा विधानसभा मतदारसंघातील आपल्या मतदारांचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.