वॉशिंग्टन, 19 एप्रिल : विमानप्रवासात प्रत्येकाला काही ना काही बरे-वाईट अनुभव येत असतात. अमेरिकेतल्या जास्त वजन असलेल्या एका एन्फ्लुएन्सरला विमानप्रवासादरम्यान तिच्या लठ्ठपणामुळे एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. ‘विमान कंपनीचे कर्मचारी प्रवाशांसोबत भेदभाव करतात, त्यांना चुकीची वागणूक देतात’ असं म्हणत या महिलेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं. तिनं ऑनलाइन याचिका सुरू करून प्लस साइज म्हणजेच वजन जास्त असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुविधांची मागणी केली आहे. तिच्या या उपक्रमाचं अमेरिकेत जोरदार कौतुक होत आहे. अमेरिकी नागरिकांचा या महिलेला चांगला पाठिंबा मिळत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
बॉडी शेमिंग झाल्यास कोणत्याही व्यक्तीचा पारा चढू शकतो. अमेरिकेतल्या जास्त वजन असलेल्या एका एन्फ्लुएन्सरच्या बाबतीत विमानप्रवासादरम्यान असा प्रसंग घडला. त्यानंतर तिने या भेदभावाबद्दल आणि प्रवाशांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल एक महत्त्वाचं पाऊल उचललं. त्यामुळे सर्व जण तिचं भरभरून कौतुक करत आहेत. वॉशिंग्टनमधल्या जेलिनने या प्रकरणी Change.org वर एक ऑनलाइन याचिका सुरू केली आहे. त्यात तिने प्लस साइज ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुविधा देण्याची मागणी केली आहे. प्रवाशांची शरीरयष्टी लक्षात न घेता, विमान कंपन्यांनी हवाई प्रवास सर्वांसाठी आरामदायी आणि सुलभ कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी जेलिनने केली आहे.
बॉडी शेमिंगमुळे अनेकांचे टोमणे खावे लागलेल्या जेलिनने एका मुलाखतीत सांगितलं, की, `मला आणि माझ्यासारख्यांना अन्य प्रवाशांकडून भेदभावाचा आणि अस्वस्थ करणाऱ्या नजरेचा सामना करावा लागतो. अलिीडेच पास्को ते डेन्व्हरदरम्यानच्या विमान प्रवासात मला आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लोकांकडून अपशब्द आणि द्वेषपूर्ण टीकेचा सामना करावा लागला. दोन तासांच्या विमानप्रवासात प्रवाशांनी आमचं जगणं कठीण करून टाकलं.`
`त्याचप्रमाणे दुसऱ्या एका फ्लाइटमध्ये मला आर्मरेस्ट सीटवर बसण्यास विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भाग पाडलं. त्यामुळे मला खूप दुखापत झाली. फ्लाइट अटेंडंटने माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं, ` असं जेलिनने सांगितलं. `त्यामुळे प्लस साइज अर्थात वजन जास्त असलेल्या प्रवाशांसाठी नवीन धोरण तयार केलं जावं अशी मागणी तिने केली आहे. `एफएए`ने अशा प्रवाशांकरिता सुलभ आणि ज्यादा सीट्स उपलब्ध करून द्याव्यात,` अशीही तिची मागणी आहे.
`प्लस साइज असलेल्या प्रवाशांना त्यांच्या आकारमानानुसार ज्यादा सीट किंवा गरजेनुसार दोन सीट्स निशुल्क मिळाव्यात. माझ्यासारखे प्रवासी विमानप्रवासादरम्यान सुरक्षिततेसाठी दोन सीट्स बुक करतात, त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. प्लस साइज असलेल्या प्रवाशांसाठी जास्त आरामदायी आणि पाय ठेवण्यासाठी जास्त जागा असलेल्या सीट्स तयार केल्या गेल्या पाहिजेत. काही विमान कंपन्या जास्त लेगरूम असलेल्या सीट्ससाठी प्रीमियम चार्जेस घेतात. यासाठी त्यांना शिक्षाही झाली पाहिजे,` अशी मागणी जेलिनने केली आहे.
दरम्यान, जेलिनने दाखल केलेल्या ऑनलाइन याचिकेत अमेरिकेचं सेंट्रल ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, परिवहन सुरक्षा प्रशासन आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अधिकाऱ्यांना टॅग केलं आहे. हजारो नेटिझन्सनी या महिलेच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. या याचिकेद्वारे विमान कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणून अशा व्यक्तींच्या हक्कासाठी अधिक चांगल्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी नेटिझन्सनी अमेरिकी प्रशासनाकडे केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.