पुणे, 17 एप्रिल : बार्शी येथील शेतकरी रमेश आरगडे याचा कांद्याचा टेम्पो पुणे महानगरपालिकेने जप्त केला होता. त्यासाठी सदाभाऊ खोत यांनी आज सकाळपासून शनिवार वाडा ते पुणे महानगरपालिका असा सर्व शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढला. आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी टेम्पो सोडतो असं सांगितले. त्यानंतर तो शेतकरी टेम्पो आणण्यासाठी गेले असता या पद्धतीचा कोणताही आदेश किंवा निरोप आम्हाला आलेला नाही. त्यामुळे आम्ही टेम्पो सोडू शकत नाही असं सांगितलं. त्याबरोबर तात्काळ शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाने दरवाजा न खोलल्याने त्यावरून चढून सदाभाऊ खोत हे आपल्या शेतकऱ्यांसोबत महानगरपालिकेत घुसले आणि प्रशासनाला जाब विचारला.
सदाभाऊ खोत यांचे लक्षवेधी आंदोलन
तुमच्या शहरातून (पुणे)
दिवस रात्र कष्ट करून रक्ताच पाणी करून काबाड कष्ट करणारा बार्शी तालुक्यातील तावडी येथील शेतकरी रमेश आरगडे हा कांदा उत्पादक शेतकरी आपल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने पुणे-सोलापूर हायवे वरती हडपसर येथे हायवे बाजूला आपला कांद्याचा टेम्पो लावून कांदा विकत होता. तेव्हा पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त महादेव जगताप या अधिकाऱ्याने कार्यवाही करता 40 हजार रुपयाचा दंड केला. याविरोधात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात रयत क्रांती संघटनेने शनिवारवाडा ते पुणे महानगरपालिका पर्यंत मोर्चा काढत लक्षवेधी आंदोलन केले. महानगरपालिकेच्या दारात आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना समोर बसून आंदोलन सुरू झाले.
वाचा – राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी, आमदार मुंबईकडे रवाना, अजितदादांनी मौन सोडलं!
अधिकाऱ्यांची फिरवा फिरवी
तसेच ज्या अधिकाऱ्याने शेतमाल रस्त्याकडे विकतो म्हणून चाळीस हजार दंड केला. त्याच अधिकाऱ्याच्या अंगणात बसून सदाभाऊ खोत यांनी 10 रुपये किलोने कांदे विकले. खोत यांची आक्रमकता पाहून तेथील प्रशासनाने एक शिष्टमंडळ बोलून घेतले व सदरचे शेतकऱ्याचे टेम्पो कोणताही दंड न करता सोडण्याचे कबूल केले. त्यानंतर तो शेतकरी संबंधित कार्यालयात गेल्यानंतर असा कोणताही आदेश वरिष्ठांकडून आम्हाला आलेला नाही. त्यामुळे आम्ही टेम्पो सोडणार नाही असे सांगून त्याला धडकावले. हे सदाभाऊ खोत यांना कळताच त्यांनी महानगरपालिकेच्या गेटवर गेले. त्यावेळी सदाभाऊ खोत यांना पोलीस प्रशासनाने गेट वरच रोखले, तेव्हा सदाभाऊ खोत हे गेटवर चढून आपल्या शेतकऱ्यांसोबत आत जाऊन पुन्हा त्यांच्या ऑफिसच्या समोर बसले. आंदोलनाच्या चढत्या वेगाने तेथील महानगरपालिकेचे प्रशासन ठप्प झाले. तात्काळ तेथील आयुक्त यांनी संबंधित टेम्पो तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आणि अर्ध्या तासातच टेम्पो महानगरपालिकेच्या गेटवर येतात सर्वच कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलाल उधळून तो टेम्पो शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.