बंगळुरू 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झाल्यानंतर, आता सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र सत्तेची चावी कोणाकडे? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एक्झिट पोलनुसार, राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला भाजप आघाडीवर पाहायला मिळालं. मात्र, नंतर काँग्रेसने आघाडी घेत भाजपला मागे टाकलं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, कर्नाटक राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल झाल्याचं पाहायला मिळालंय. यंदा मात्र हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र सरकार कोणाचं? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
भाजपचं मिशन दक्षिण –
सध्याच्या कलानुसार भाजपला कर्नाटकमध्ये प्रचार करूनही मोठा झटका बसत असल्याचं चित्र आहे. अशात भाजपच्या मिशन-दक्षिणलाही हा मोठा धक्का असू शकतो. दक्षिणेमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये भाजपला अद्याप स्वतःला पाय रोवता आले नाही. दक्षिणेकडील सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत, ज्या एकूण लोकसभेच्या जागांपैकी सुमारे 25 टक्के आहेत.
अशा परिस्थितीत दक्षिण भारत राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपला जागा मिळाल्या, परंतु उर्वरित दक्षिणेकडील राज्यांमध्ये जागा मिळाल्या नाहीत. कर्नाटकच्या माध्यमातून भाजपला दक्षिणेत पाय रोवायचे आहेत. मात्र कर्नाटकातच धक्का बसला तर तेलंगणा, आंध्र प्रदेशसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठा राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता भाजपला इथे यश मिळणार की काँग्रेस बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.