केंद्रीय पक्षांनी राज्यिय पक्षांशी युती करणे हे काही राजकारणात नवं नाही. या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होताना आजपर्यंत दिसून आला आहे. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमधून देखील हा एकत्रित येण्याचा फॉर्म्युला आपण पाहिला. याच ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. पण, आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते महाराष्ट्रातील निवडणुकांचे. भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने काही भूमिपुत्रांचा विषय बघता त्यांना राज्यिय पक्षांशी असलेली युती फायदेशीर म्हणता येईल. आजपर्यंत भाजप – शिवसेना अशी २५ वर्षांची युती राज्याने पहिली आणि त्यांचे विघटनही पाहिले. अशातच महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांची जी बेरीज किंवा आकडेवारी येईल त्यापॆक्षा एकत्र भाजपला जास्त मतं घ्यावी लागतील किंवा कोणत्या तरी पक्षाची युती किंवा त्या पक्षाचा पाठिंबा लागेल.
सध्याच्या चर्चा आणि वातावरण बघता मनसे आणि भाजप युतीचा प्रस्ताव अनेकांच्या तोंडी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेनेसारखीच मनसेची भूमिका आपल्याला जाणवते आणि शिवसेनेला पर्याय म्हणूनही मनसेचा विचार केला जातो. २०११ साली राज ठाकरेंनी गुजरात दौरा करत नरेंद्र मोदींची स्तुति केली, २०१४ ला राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिलेला मात्र २०१९ ला भाजपविरोधी भूमिकेत राज ठाकरे आपल्याला दिसले. मात्र, २०२० पासून राज ठाकरे भाजपच्या जवळ भाजण्याची चिन्ह दिसून येत आहेत. त्यामुळे, भाजप आणि मनसे एकत्र येणार का हा प्रश्न सध्या सर्वच स्तरातून उमटला जात आहे. पण याआधीही कित्येकवेळा भाजप मनसे युतीच्या चर्चा याआधीही झाल्या आणि फसल्या देखील.
पण सध्या भाजपसमोर मोठं आव्हान आहे ते मुंबई महापालिकेचे. मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्लाचं ! अशा ठिकाणी जर भाजपला सत्ता मिळवायची असेल तर मनसेचा फायदा भाजपला होऊ शकतो. गेल्या दोन मुंबई महापालिकेच्या निवडणुका जर पाहिल्या तर दोघांच्या मतांमधलं अंतर लक्षणीय कमी झालं आहे. तो जो फरक आहे, तो भाजपाला कमी करायचा आहे. त्यासाठी मनसेची त्यांना मदत होऊ शकते. भाजपाला आणखी एक गरज आहे ती म्हणजे मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर काम करायची. मराठीचबद्दलच्या जुन्या भूमिकांमुळे ते मराठीविरोधी अशी प्रतिमा तयार झाली आहे आणि त्याचा सेना कायम फायदा घेत आली आहे. आता जर मनसेसारखा संपूर्ण एक मराठीवादी पक्ष त्यांच्यासोबत आला तर ही जुनी प्रतिमा बदलण्यास भाजपाला फायदा होईल.
सत्तावाटपाच्या वादातून शिवसेनेनं युती तोडल्यापासून भाजप-शिवसेनेत प्रचंड दुरावा आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करून शिवसेनेनं भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. मुंबई महापालिकेतून शिवसेनेची सत्ता घालवून ह्याचा राजकीय बदला घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मागच्या निवडणुकीत भाजपनं स्वबळावर लढून शिवसेनेला चांगली टक्कर दिली होती. पण, महापौर शिवसेनेचाच झाला. शिवाय, तेव्हाच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक आहे. तेव्हा राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होता. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेनं इतर पक्षातील नगरसेवक गळाला लावून आपली बाजू आणखी भक्कम केली आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदाही भाजपला झाला. आता तो फायदा मिळेल असं कुणी सांगू शकत नाही. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पुण्यात शिवसेना, राष्ट्रवादीला मदत करेल अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपला मनसेची गरज लागणार आहे.
पण याचबरोबर, मनसेची राज्यातील परप्रांतियांबाबत असलेली भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. खरतरं गेल्या अनेक दिवसांपासून केन्दिरी मंत्री नितीन गडकरी , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेकडूनही हिंदुत्ववादाचा प्रचार सुरू झाला. त्यामुळे भाजप मनसेशी युती करेल असं चित्र निर्माण झालं होतं. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून राज ठकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असं सांगितलं जात.
गेल्या दीड वर्षांत मनसे हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकल्याचंही दिसून आलं. पक्षाच्या वर्धापनदिनी मनसेने पक्षाचा झेंडा सुद्धा बदलला.अयोध्या राम मंदिर पायाभरणीनंतर ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारं पत्र लिहिलं होतं. गेल्यावर्षी मार्च महिन्यात राज ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले होते. यामुळे मनसे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली.कोरोना काळात विरोधक म्हणून भाजपसोबत मनसेनेही ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमधील निर्बंधांवरून मुंबई मनसे आक्रमक होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून कारभार चालवतात अशी टीका सुद्धा मनसे नेत्यांकडून करण्यात आली. एक शक्यता अशीही वर्तवली जात आहे की, आता युती केली नाही तरी महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर हे दोन पक्ष एकत्र येऊ शकतात.
शिवसेनेवर नाराज असलेला मराठी मतदार हा भाजपपेक्षा मनसेला मत देईल ही शक्यता नाकारता येत नाही. पण सरळ युती होण्यापेक्षा मैत्रीपूर्ण काही बाबी ठरवता येतात का याचा प्रयत्न होऊ शकतो. तसंच गेल्या महापालिका निवडणुकांचे निकाल पाहिले तर मनसे भाजप एकत्र आली तर कदाचित या पर्यायाचा दोन्ही फायदा होऊ शकतो असं दिसतं. त्यामुळे निकालानंतर युती करण्याचा पर्यायही त्यांच्याकडे आहे. मनसेला भाजपमुळे नवसंजीवनी मिळवण्याची संधी असल्याचंही जाणकार सांगतात. युतीमुळे केंद्रात सत्ता असलेल्या राष्ट्रीय पक्षाची साथ मनसेला मिळेल. भाजपकडे शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फौज आहे, केंद्रात सरकार असल्याने आर्थिक बाजू भक्कम आहे याचाही मनसेला फायदा होईल अशा चर्चांना सध्या उधाण आलं आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात भाजप मनसे एकत्र येणार का , युती झाल्यास महाराष्ट्रातील राजकीय चित्र कसं बदलणार, महाविकास आघाडीला ही युती टक्कर देणार का, भाजपला याचे परिणाम इतर राज्यात बघायला मिळणार का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात.