नवी दिल्ली, 20 मे : ग्रँड ट्रंक रोड किंवा जीटी रोड हा भारतातील सर्वांत जुना महामार्ग आहे. त्याची एकूण लांबी सुमारे 2500 किमी आहे. पूर्वी हा एक प्रमुख व्यापारी मार्ग होता. आजही हा महामार्ग देशातील सर्वात प्रसिद्ध रस्त्यांपैकी एक असून पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. हा रस्ता चंद्रगुप्त मौर्याच्या कारकिर्दीत बांधला गेला असल्याचे मानले जाते. या मार्गाचा वापर सिकंदरनेही केला होता. तथापि, सध्या आपण पाहत असलेला जीटी रोड उत्तर भारताचा शासक शेरशाह सूरी याने 16 व्या शतकात बांधला होता. तेव्हा या महामार्गचे नाव सडक-ए-आझम असं होतं. कालांतराने वेगवेगळ्या राजांनी त्याचा विस्तार केला.
आज हा रस्ता अफगाणिस्तानपर्यंत जातो. त्याचे नावही काळानुसार बदलत राहिले. शेवटी ब्रिटिशांनी याचे नाव जी. टी. रोड ठेवलं आणि तेव्हापासून हा महामार्ग याच नावाने ओळखला जाऊ लागला. या महामार्गाची सुरुवात बांगलादेशापासून होते आणि त्याचा शेवट अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये होतो. या महामार्गाचा वापर पूर्वी व्यापारासाठी होत असे. या ऐतिहासिक महामार्गाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वेळोवेळी बदललं नाव
या महामार्गाचं नाव अनेकदा बदललं गेलं. चंद्रगुप्त मौर्याच्या शासन काळात या महामार्गाचे नाव उत्तर पथ होतं, असं मानलं जातं. त्यानंतर या महामार्गाला शाह राह-ए-आझम, सडक-ए-आझम, बादशाही सडक, द लाँग वॉक आणि अखेरीस ग्रँड ट्रंक रोड असं झालं. ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिग यांनी या रस्त्याला जीवनदायी नदी असं म्हटलं आहे. याच्यासारखा दुसरा रस्ता जगात नाही, असंही ते नमूद करतात. मात्र आज सर्वात लांब महामार्ग अमेरिका आणि चीनमध्ये आहेत.
या महामार्गाचा वापर कशासाठी होत असे?
हा एक ऐतिहासिक महामार्ग आहे. मौर्य काळात भारत आणि काही पश्चिम आशियाई देशांमधील व्यापारासाठी हा मुख्य मार्ग असल्याचं मानलं जातं. या महामार्गाची उभारणी आठ टप्प्यांत करण्यात आली. आज हा महामार्ग बांगलादेशातील चितगावपासून सुरू होतो. त्यानंतर तो वर्धमान, आसनसोल, धनबाद, सासाराम, मुगलसराय, प्रयागराज, अलीगड, गाजियाबाद, दिल्ली, कर्नाल, जालंधर आणि अमृतसरपर्यंत जातो. त्यानंतर पाकिस्तानमधील लाहोर, झेलम, रावळपिंडी, पेशावर वरून तो खैबर खिंडीतून अफगाणिस्तानच्या हद्दीत पोहोचतो आणि काबुलमध्ये त्याचा शेवट होतो. भारतात ग्रँड ट्रंक रोड वेगवेगळ्या महामार्गांमध्ये विभागला गेला आहे. यात एनएच -1, एनएच -2, एनएच-5 आणि एनएच -91 चा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.