नवी दिल्ली 27 एप्रिल : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले. तेव्हापासून पाकिस्तान घाबरला असून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची भीती पाकिस्तानला सतावत आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी ही माहिती दिली. भारत लवकरच आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, “20 एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला. तेव्हापासून भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, अशी चर्चा पाकिस्तानात आहे”. अब्दुल बासित यांनी याबाबतचा व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणावर आपलं म्हणणे मांडलं आहे.
व्हिडिओमध्ये बासित म्हणतात, की “पाकिस्तानमधील लोकांना अशी भीती आहे, की भारताकडून आणखी एक सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइक होईल. मात्र, मला वाटत नाही की भारत पुन्हा असे करेल, कारण भारत यावर्षी SCO बैठक आणि G20 ची अध्यक्षता करत आहे. जोपर्यंत तो एससीओचा अध्यक्ष आहे, तोपर्यंत भारत कोणताही गैरप्रकार करणार नाही, परंतु पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांदरम्यान भारत ते पुन्हा करू शकतो. भारतात निवडणुकांच्या आधी हे होऊ शकतं.”
यानंतर बासित पुंछमधील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करू लागले. ते म्हणाले, “ज्याने हे केलं, मग तो मुजाहिदीन असो वा अन्य कोणी. त्यांनी नागरिकांना नव्हे तर लष्कराला लक्ष्य केलं आहे. ते न्याय्य संघर्षात गुंतलेले आहेत. ते आंदोलन करत असतील तर त्यांनी लष्कराला लक्ष्य केलं आहे, पण नागरिकांना नाही. आंतरराष्ट्रीय कायदादेखील याची परवानगी देतो. आपण कुठे उभे आहोत हे भारताला माहीत आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी अब्दुल बासितचा हा व्हिडिओ समोर आला आहे. खरं तर, 20 एप्रिल रोजी अज्ञात दहशतवाद्यांनी राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछमधून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले होते. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते, लष्कराने या घटनेबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, शहीद जवान हे राष्ट्रीय रायफल्सचे होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.