रायचंद शिंदे, प्रतिनिधी
आंबेगाव, 1 जून : कपडे धुण्यासाठी नदीपात्राजवळ गेलेल्या चार सख्ख्या बहिणींपैकी दोन जणी पाण्यात बुडाल्या आहेत, यामध्ये दोघींचा मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब जवळ घोडनदी पात्रात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.
या तरुणी आपल्या मावशीच्या घरी मावस भावाचा वाढदिवस साजरा करण्यासातठी मुंबई येथून आल्या होत्या. या दोघी मावशी कुशा घोरपडे, मावस बहीण वर्षा घोरपडे आणि कावेरी आलझेंडे यांच्या सोबत घोड नदीवर कपडे धुत होत्या. यावेळी कावेरीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी प्रीती खंडागळे आणि आरती खंडागळे यांनी नदीत उडी मारली मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने दोघीही बुडाल्या यात प्रीती शाम खंडागळे (वय 17) आणि आरती श्याम खंडागळे ( वय 18) या तरुणींचा बुडून मृत झाला आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
एकलहरे येथील रहिवासी असलेल्या प्रियंका राहुल डोके यांना नदीपात्राजवळ महिलांचा आरडाओरडा ऐकू येत होता. त्यावेळेस त्यांनी ही घटना पती राहुल डोके यांना फोन करून सांगितली. एकलहरे गावचे माजी उपसरपंच दीपक डोके, क्लार्क राहुल डोके, पोलीस पाटील निखिल गाडे, अक्षय धोत्रे, राम फलके, माजी सरपंच संतोष डोके यांनी घटना समजल्यानंतर नदीपात्रात उड्या मारून मुलींचा शोध घेतला. परंतु या घटनेत बराच वेळ झाल्यामुळे त्या मृत्युमुखी पडल्या होत्या. मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुदाम घोडे तसेच मंचर पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस कर्मचारी सोमनाथ गवारी ,धनेश मांदळे ,गणेश येळवंडे ,अभिषेक कवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि घटनेचा पंचनामा केला आहे . पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.