पाटणा, 24 एप्रिल : चहा म्हणताच अनेकांना चहा पिण्याची तलब आली असेल. भारतात चहाप्रेमींची संख्या कमी नाही. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्याशिवाय होतच नाही. तर काही जणांना दिवसभर कितीही आणि कधीही चहा दिला तरी त्यांची पिण्याची तयारी असते. पण एक अशी व्यक्ती जिने तर चक्क चहासाठी आपलं घरदारही विकलं. डोक्यावरील छप्पर सोडलं पण व्यक्तीने आपली 250 वर्षांपासून चालत आलेली 5 पिढ्यांची परंपरा मात्र मोडली नाही.
चहासाठी घरदार विकलं, वाचूनच तुम्हाला थोडा धक्का बसला असेल. पण यामागील खरं कारण तुम्हाला समजलं तर मात्र तुम्ही या व्यक्तीचं कौतुक कराल. आतापर्यंत तुम्ही पदवीधर चहावाला, एमबीए चहावाला पाहिला असाल, पण हा चहावाला खास कारणासाठी फेमस झाला आहे. खरंतर असा चहा विक्रेता तुम्ही आजवर पाहिलाच नसेल.
बिहारच्या गयामधील एका चहावाल्याची ही गोष्ट. संजय चंद्रवंशी असं या चहावाल्याचं नाव. ज्याची चर्चा सर्वत्र होते आहे. जयप्रकाश नारायण हॉस्पिटलजवळ संजयचं चहाचं दुकान आहे. ते इतकं प्रसिद्ध आहे की रोज सकाळी त्या दुकानावर चहा पिण्यासाठी गर्दी असते. पण हे चहाचं दुकान बनवण्यासाठी त्याने आपलं राहतं घर विकलं. आता तो आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. यामागील कारणही खास आहे. ते म्हणजे त्यांच्या कुटुंबात 250 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा. 5 पिढ्यांची ही परंपरा संजयला मोडायची नव्हती, ती म्हणजे गरीबांना दान.
चहावाल्याचं किळसवाणं कृत्य! तुम्हीही पित नाहीत असा टपरीवरचा चहा; संतापजनक VIDEO VIRAL
हो संजय आपलं घर विकून चहा विकतो आहे, याचं कारण म्हणजे गरीब लोक. त्याच्या चहाच्या दुकानांवर अशाच लोकांची गर्दी असते. सकाळी मुंगीला साखर आणि गायीला बिस्किटं देऊन त्यांचा दिवस सुरू होतो. यानंतर संजयच्या चहाच्या दुकानात भिकारी,लाचार, गरीब लोक चहा प्यायला येतात. संजय या लोकांना मोफत चहा पाजतो. चहासोबत फ्रीमध्ये बिस्किटंही खायला देतो. सकाळचा चहा झाल्यावर दुपारचं जेवण तो या लोकांना देतो.
न्यूज18 लोकलशी बोलताना संजय कुमार चंद्रवंशी म्हणाला, त्यांच्या आजोबांच्या काळापासून कुटुंबात दानधर्माची परंपरा चालू आहे. त्यांचं कुटुंब गेली 250 वर्षे आणि 5 पिढ्यांपासून गरीबांना आधार देत आहे. पण काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे मोठी आर्थिक कोंडी झाली होती आणि त्यानंतर ते खूप अस्वस्थ झाले होते. कारण ते गरिबांना चहा आणि जेवण देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी शहरातील कंदी नवाडा भागात असलेले घर लोकांच्या सेवेसाठी 11 लाख रुपयांना विकलं. मग ते पैसे गरीबांच्या मदतीसाठी वापरले. त्यानंतरही मिळकतीच्या निम्मी रक्कम ते गरीबांवर खर्च करतात.
‘ऑडी चायवाला’; लग्झरी गाडीतून विकतोय चहा; Video होतोय तुफान व्हायरल
लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी गरीबांना तीन वेळचं जेवण खाऊ घातलं होतं. पण आता आर्थिक स्थिती ढासळल्यानंतर आता ते लोकांना एक वेळचं जेवण देत आहेत.
संजयच्या दातृत्वाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं, त्यांना आर्थिक मदतही देऊ केली. पण त्यांनी ती घेण्यास नकार दिला. अशा कामातून आपल्याला आनंद मिळतो, असं ते सांगतात. या कार्यात त्यांना त्यांच्या कुटुंबाचंही सहकार्य मिळतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.