नवी दिल्ली, 15 एप्रिल : दक्षिण काश्मीरमधील हिमालयात 3 हजार 880 मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ मंदिराची वार्षिक यात्रा 1 जुलैपासून सुरू होणार आहे. ही यात्रा दोन महिने म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत चालेल, असं संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं. यात्रेसाठी 17 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे.
जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनात झालेल्या श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या (एसएएसबी) 44व्या बैठकीत या वर्षीच्या (2023) यात्रेचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं.
अमरनाथ यात्रेचं वेळापत्रक जाहीर करताना सिन्हा म्हणाले की, ही तीर्थयात्रा निर्विघ्न आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. ते म्हणाले, “ही यात्रा सुरळीत पार पडावी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्व भेट देणार्या भाविकांना आणि सेवा प्रदात्यांना सर्वोत्तम दर्जाची आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सुविधा पुरवण्याचं काम प्रशासन करेल”.
“गुंफा मंदिराची यात्रा सुरू होण्यापूर्वी या प्रदेशातील दूरसंचार सेवा कार्यान्वित केली जाईल. शासनाचे सर्व संबंधित विभाग हे सध्या निवास, वीज, पाणी, सुरक्षा या व्यवस्था करून तीर्थयात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी काम करत आहेत. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांवरून यात्रेला एकाच वेळी सुरुवात होईल,” असंही लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले.
अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार, श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग नरुला यांनी सांगितलं की, 62 दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या दोन्ही मार्गांवर दररोज 500 यात्रेकरूंसाठी सुविधा उपलब्ध असेल.
हे वाचा – शनी मागे लागलाच म्हणून समजा; जीवनात अशी कामं करणाऱ्यांना शनी सोडत नाही कधी
श्री अमरनाथजी श्राईन बोर्ड (एसएएसबी) घरी असलेल्या भक्तांसाठी सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीच्या थेट प्रक्षेपणाची सोय करणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर यात्रेची, मार्गावरील हवामानाची रिअल टाईम माहिती मिळवण्यासाठी आणि इतर अनेक सेवा ऑनलाइन मिळवण्यासाठी अॅप उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
हे वाचा – तुळशीची 11 पाने बदलतील तुमचे नशीब, मनातील अपूर्ण इच्छा क्षणात होईल पूर्ण
अमरनाथ हे हिंदू धर्मीयांचं पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. या गुहेमध्ये बर्फाचं शिवलिंग तयार होतं. ते पहायला दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणाला भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे आठ ते 10 फूट उंचीचं असतं पण, लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असंही मानलं जातं की, शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होतो. नैसर्गिक बर्फापासून निर्माण झाल्यामुळे त्याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असंही म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.