धाराशिव, २५ एप्रिल : राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. यातच अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. तसेच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले आहे. आज सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. अजित पवार यांच्या सासरवाडीत झळकलेल्या या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात राजकीय भूकंप होणार अशा चर्चा गेल्या आठवड्यात रंगल्या होत्या. अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसंच जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीबरोबर राहणार आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं.
रिफायनरीला काँग्रेसचा विरोध नाही पण…; नाना पटोलेंची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका
दरम्यान, एका मुलाखतीत अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवताना म्हटलं होतं की, होय 100 टक्के आवडेल. तसंच 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का या प्रश्नावरही 2024ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार असल्याचं अजित पवार म्हणाले होते.
बारामतीत आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माझ्या विषयी अनेक बातम्या पसवणायचे काम केलं. पत्रकार जरा कुठ गेलं तर अजित पवार नॉट रीचेबल. बाकी लोक आहेत की माझ्या मागे का आहेत बाबा? एखाद्याच्या मागे लागायचं म्हणजे किती मागे लागायचे? मी अस का बोललो अस विचारले जाते. मी माझ्या येत ते बोलतो. लोकांना अस वाटत की 2019ला जसं केलं तसेच जातो की काय. पण मी आज तुम्हाला सांगतो की मी कायमच राष्ट्रवादी मध्ये राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.