ठाणे, 10 मे : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांआधीच शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जुंपलेली दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती राज्यापालांना दिली आहे. त्याच्या चौकशीची मागणी लोकायुक्तांकडून करण्यात यावी अशी मागणी आम्ही केल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे.
श्रीकांत शिंदे यांचा कवितेतून बाण
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या टीकेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विटर वर कविता पोस्ट करुन थेट आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. “भ्रष्टाचाराचे बाळकडू प्यायले, रस्त्यावरचे डांबर गिळले, कचऱ्याचे डोंगर फस्त केले, मिठीच्या गाळाचे पेले रिचवले, डिजीटल शिक्षणातून दही मटकावले, कोविड मृतांच्या टाळूवरचे लोणीही नाही सोडले, तरीही युवराज, किती ही पोटदुखी? भ्रष्टाचार करुनी उभा जन्म गेला, तरी भूक नाही संपली, बेसुमार लुटमार करून माती खाल्ली, अन् मती आता गुंग झाली.”
तुमच्या शहरातून (मुंबई)
भ्रष्टाचाराचे बाळकडू प्यायले
रस्त्यावरचे डांबर गिळले
कचऱ्याचे डोंगर फस्त केले
मिठीच्या गाळाचे पेले रिचवले
डिजीटल शिक्षणातून दही मटकावले
कोविड मृतांच्या टाळूवरचे लोणीही नाही सोडले
तरीही युवराज, किती ही पोटदुखी?
भ्रष्टाचार करुनी उभा जन्म गेला
तरी भूक नाही संपली
बेसुमार लुटमार…
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) May 10, 2023
आदित्य ठाकरे यांचे आरोप काय होते?
आदित्य ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती राज्यापालांना दिली आहे. त्याच्या चौकशीची मागणी लोकायुक्तांकडून करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. पाच कंत्राटदारांना 66 टक्के जादा दराने कामं देण्यात आली आहेत. रस्ते कामात सहा हजार कोटींचा घोटाळा आणि एकाच कंपनीकडून खडी खरेदी करण्याची सक्ती असे तीन मुद्दे आम्ही राज्यपालांकडे मांडल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
वाचा – कोर्टाच्या निकालाआधी शिंदे राजीनामा देतील का? फडणवीस स्पष्टच बोलले
उद्या सत्तासंघर्षावर निर्णय?
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, निकालाआधी सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.